पाकिस्तानसोबत क्रिकेट बंद; हिंदुस्थानला जमलं नाही ते अफगाणिस्ताननं करून दाखवलं, हवाई हल्ल्यानंतर तिरंगी मालिका खेळण्यास नकार

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून विरोधाचा सूर उमटत असतानाही हिंदुस्थानने पाकिस्तानसोबत क्रिकेटचे सामने खेळले. त्यामुळे मोदी सरकार, बीसीसीआय आणि हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना टीकेलाही सामोरे जावे लागले. पण आता हिंदुस्थानला जे जमले नाही ते अफगाणिस्तानने करून दाखवले आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघात तिरंगी मालिका खेळली जाणार होती, मात्र यात सहभागी होण्यास आता अफगाणिस्तानने नकार दिला आहे.

पाकिस्तानने शुक्रवारी रात्री अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. पक्तिका प्रांतातील उरगून जिल्ह्यात केलेल्या या हवाई हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानच्या 8 नागरिकांचा मृत्यू झाला. यात तीन क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. कबीर, सिबगातुल्ला आणि हारून अशी तिघांची नावे आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत होणाऱ्या तिरंगी मालिकेत खेळण्यास नकार दिला आहे. नोव्हेंबर महिन्यात ही तिरंगी मालिका खेळली जाणार होती.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला. पाकिस्तानने उरगून जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यात तीन क्रिकेटपटूंसह 8 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जखमी झाले. हे खेळाडू एक मैत्रीपूर्ण लढत खेळण्यासाठी आले होते. याचवेळी त्यांना लक्ष्य करण्यात आले. या घटनेतील पीडितांचा आदर म्हणून अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिरंगी टी-20 मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे एसीबीने म्हटले.

दरम्यान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानने काबूलवर हवाई हल्ला केल्यानंतर अफगाणिस्तानने जोरदार प्रत्युत्तर देत सीमेजवळील पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त करत त्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर दोन्ही देशात 48 तासांचा युद्धविराम झाला होता. मात्र यानंतर काही तासात पाकिस्तानने पक्तिका प्रांतात हवाई हल्ला केला.

मृतांचा आकडा वाढला

दरम्यान, पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 40 नागरिकांचा मृत्यू झाला असून 170 हून अधिक जखमी झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी करिमुल्लाह झुबैर आगा यांनी टोलो न्यूजला दिली. मृतांमध्ये महिला आणि मुलांची संख्या जास्त असून मोठी वित्तहानीही झाली आहे.