
कामगार चौकात ऑइल टैंकरला वेल्डिंग करत असताना टँकरच्या टाकीचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, या टाकीचा पत्रा लागून एका ४७ वर्षीय खानावळ चालकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायं. ५ वाजेच्या सुमारास कामगार चौकातील ट्रक टर्मिनल परिसरात घडली.
एमआयडीसी वाळूज परिसरातील ट्रक टर्मिनल परिसरात काळे ऑइल खरेदी-विक्री करणारी एजन्सी आहे. या एजन्सीचा ऑइल वाहणाऱ्या टँकरला (एमएच २० जीसी २०१५) गळती लागल्यामुळे वेल्डिंग करण्यासाठी कामगार चौकातील वेल्डिंगच्या दुकानावर चालक खंडू अनिल गवळी हा घेऊन आला होता. या टँकरची वेल्डिंग सुरू असताना टँकरवरील टाकीचा पाठीमागील भाग अचानक उडाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील उद्योजक, कंपन्यातील कामगार, दुकानांतील नागरिक भयभीत झाले. अनेकांनी कंपनी, दुकाना बाहेर धाव घेतली. स्फोट झाल्यानंतर टँकरच्या टाकीचा पाठीमागील काही भाग उडून थेट एका खानावळीत स्टूलवर बसलेले रफीक गोधन शेख (४७, रा. कोहिनूर पार्क, बजाजनगर) यांच्या पायाला लागून त्यांचे पाय गुडघ्यापासून तुटून एका दुकानाच्या आवारात जाऊन पडले. त्यांना उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तसेच बाजूच्या दुकानात काम करणारे कामगार सचिन केशव भालेराव यांच्या पायाला मार लागून ते जखमी झाले असून या स्फोटात आणखी काहीजण किरकोळ
जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत पाण्याचा मारा करून टैंकरला लागलेली आग नियंत्रणात आणली. तसेच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्यासह वाळूज वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेत टँकरचालक खंडू अनिल गवळी (४०, रा. पंचमुखी महादेव मंदिर, बजाजनगर) व एजन्सीचे व्यवस्थापक गजानन मधुकर खरबळ (रा. वडगाव कोल्हाटी) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
उडालेल्या पत्र्यामुळे विद्युतपुरवठा खंडित
टँकरच्या स्फोटामुळे उडालेला पत्रा विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेवर जाऊन पडला. त्यामुळे तारा व केबल वायर तुटल्यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. स्फोटामुळे उडालेला एक मोठा पत्रा विद्युत तारेला लागला नसता तर तो शेजारील कंपनीत पडून कामगार जखमी झाले असते. सुदैवाने मोठी जीवित हानी टळली.
रिकाम्या टँकरमुळे हानी कमी
वेल्डिंग करण्यासाठी आलेले टैंकर ऑइल रिकामे करून आले होते. मात्र, टँकरवरील झाकण पेंक असल्याने वेल्डिंग करताना गॅस तयार झाला असावा, त्यामुळे अचानक पाठीमागील बाजूच्या पत्र्याचा मोठा स्फोट झाला. सुदैवाने यामध्ये ऑइल कमी होते. हे ऑइल सर्वत्र उडून पेट धरण्याची शक्यता अधिक होती. जखमी रफीक शेख व इतरांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, बराच वेळ वाट पाहूनही रुग्णवाहिका आलीच नाही. त्यामुळे जखमीला खाजगी वाहनातून उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच जखमी शेख यांचा मृत्यू झाला.