संसदेजवळील ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटला भीषण आग, इमारतीत अनेक खासदारांचे निवासस्थान

अनेक खासदारांचे निवासस्थान असलेल्या नवी दिल्लीतील ब्रह्मपुत्र अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. शनिवारी दुपारी 1.22 वाजता ही आग लागली. यात काही लोक भाजले असल्याचे वृत्त आहे. आग कशामुळे लागली याबाबत अद्याप समजू शकले नाही.

संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बीडी बिशंबर दास मार्गावरील ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटमध्ये ही आग लागली. लोकसभा आणि राज्यसभेचे अनेक खासदार आणि त्यांचे कर्मचारी देखील अपार्टमेंटमध्ये राहतात. आगीच्या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. आग आधी तळमजल्यावर लागली आणि नंतर चार मजल्यापर्यंत पसरली.

अपार्टमेंटच्या बाहेर पीडब्लूडी लाकडी वस्तू साठवून ठेवल्या होत्या. त्याला फटाक्याच्या ठिणगीमुळे आग लागली असावी अशी शक्यता इमारतीतील रहिवासी विनोद यांनी वर्तवली आहे. विनोद यांची मुलगी आणि पत्नी देखील आगीत भाजल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची एक मुलगी घराबाहेर होती, त्यामुळे ती वाचली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)