
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मुसलमान समाजाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. केंद्राच्या सर्व योजनांचा लाभ घेऊनही आम्हाला मतं देत नाही, असे म्हणत गिरीराज सिंह यांनी मुसलमानांना नमकहराम म्हटले. त्यांच्या या विधानाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. मतं दिली नाही म्हणून कुणालाही नमकहराम म्हणू शकत नाही, मोदींनी गिरीराज सिंह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राऊत यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केली.
केंद्राच्या सर्व योजनांचा लाभ मुस्लिम घेतात आणि आम्हाला मतं देत नाहीत, असे गिरीराज सिंह म्हणतात. हे चुकीचे आहे. अनेक ठिकाणी मुस्लिमांनी 2014 मध्ये मोदींना भरभरून मतं दिली. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये मतं दिली. तुम्हाला मतं दिली नाही म्हणून तुम्ही त्यांना नमकहराम म्हणणार का? कोणत्याही जाती, धर्माला असे म्हणण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
तुम्हाला देशातील बहुसंख्य हिंदूंनीही मतं दिलेली नाहीत. लोकसभेला महाराष्ट्र, बंगाल, केरळ, जम्मू-कश्मीर, कर्नाटकातील हिंदूंनी तुम्हाला मतं दिली नाहीत, मग हिंदूंनाही तुम्ही नमकहराम म्हणणार का? तुम्ही वोट चोरी करून निवडून आलेला आहात. तुम्हाला हिंदूंनीही मतं दिलेली नाहीत. मुस्लिमांसोबत ज्या हिंदूंचे मीठ तुम्ही खाता सत्तेचे त्यांना तुम्ही नमकहराम म्हणणार का? अशा प्रकारचे विधान एखादा केंद्रीय मंत्री करत असेल तर मोदींनी त्याची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करायला हवी. कोणत्याही व्यक्ती, जाती, धर्माला अशा प्रकारे नमकहराम म्हणू शकत नाही, असे राऊत यांनी ठणकावले.
बिहारचा निकाल लागल्यावर अमित शहा मौन होतील!
राहुल गांधी एसआरएवर गप्प का? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ना राहुल गांधी गप्प आहेत, ना आम्ही. याबाबत सर्वात मोठे आंदोलन राहुल गांधी यांनी केले होते. बिहारचा निकाल लागल्यावर अमित शहा मौन होतील. शहा काय बोलतात काय नाही यावर देश चालत नाही. तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात. तुमच्याकडे सत्ता, ईडी, सीबीआय, पोलीस आहात म्हणून तुमचे बोलणे ऐकले जाते, असेही राऊत म्हणाले.