
सगळीकडे दिवाळीचा जल्लोष साजरा होत असतानाच प्रदूषणाच्या प्रश्नाची चिंता सतावू लागली आहे. रविवारी मुंबई शहराच्या हवेची गुणवत्ता घसरली आणि गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) थेट 172 अंकांवर पोहोचला. ही पातळी आरोग्याला हानिकारक असल्याने प्रदूषणकारी फटाके फोडणे टाळा, असे आवाहन हवामानतज्ञांनी नागरिकांना केले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरांतील तापमान विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. सलग तीन दिवस मुंबईचा पारा 36 अंशांच्या वर आहे. याचदरम्यान प्रदूषण धोकादायक पातळीवर गेले आहे. रविवारी शहरातील बहुतांश प्रदूषण मॉनिटरिंग पेंद्रांवर आरोग्याला घातक असणारा एक्यूआय नोंद झाला. वांद्रे-कुर्ला संकुल येथे प्रदूषणाचा सर्वाधिक घातक स्तर नोंदवला गेला. या ठिकाणी 253 एक्यूआयची नोंद झाली. शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत 1.07 पटीने अधिक होता. एकीकडे तापमानवाढ आणि त्यात वाढलेले प्रदूषण यामुळे दमा व इतर श्वसनविकार असलेल्या मुंबईकरांची दमछाक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हवामानतज्ञांनी नागरिकांना प्रदूषणकारी फटाके पह्डणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच श्वसनविकार असलेल्या नागरिकांनी मास्क लावावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
प्रदूषणाचे हॉटस्पॉट
मालाड 196
नेव्ही नगर, कुलाबा 194
माझगाव 188
बोरिवली पूर्व 184
मुलुंड पूर्व 184
आंबेडकर नगर 182
चकाला, अंधेरी 180
वडाळा ट्रक टर्मिनल 180