ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत ‘नो किंग्स’ आंदोलन; लोक रस्त्यावर उतरले, 2700 ठिकाणी निदर्शने

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हुकूमशाही कारभाराविरोधात अमेरिकेत ‘नो किंग्स’ आंदोलन पेटले आहे. ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी देशातील 50 राज्यांत तब्बल 2700 ठिकाणी लाखो लोक रस्त्यावर उतरले. या आंदोलकांनी ट्रम्प यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दुसऱयांदा अध्यक्षपदी आल्यापासून ट्रम्प यांनी वेगवेगळय़ा निर्णयांचा धडाका लावला आहे. यातील काही निर्णयांचा फटका तेथील जनतेला बसत असल्याने ट्रम्प सरकारविरोधात रोष आहे. ट्रम्प यांच्या आडमुठेपणामुळे अमेरिकेत ‘शटडाऊन’ सुरू आहे. अनेक सरकारी योजना आणि कार्यालये बंद आहेत. त्यामुळे लोकांच्या नाराजीत भर पडली आहे. स्थलांतरितांच्या विरोधात कारवाई करताना ट्रम्प सरकार कायद्याचे उल्लंघन करत आहे, असाही लोकांचा आरोप आहे. या साऱयाविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे.

स्वतःसाठी, शेजाऱयांसाठी आणि लोकशाहीसाठी

वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, बोस्टन, शिकागो, अटलांटा अशा सर्वच शहरांत लोक बॅनर, अमेरिकी राष्ट्रध्वज आणि वेगवेगळय़ा रंगाचे फुगे घेऊन रस्त्यावर उतरले होते. अनेक रस्त्यांवर जत्रेचा माहौल होता. आम्ही लोकशाहीसाठी, शेजारी देशांतील स्थलांतरितांसाठी आणि स्वतःसाठी रस्त्यावर उतरलो आहोत, असे निदर्शक सांगत होते. अमेरिकेत तळागाळात काम करणाऱया सुमारे 300 वेगवेगळय़ा संघटनांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते.

मी राजा नाही!

देशात निदर्शने सुरू असताना ट्रम्प हे फ्लोरिडा येथे वीकेंड सेलिब्रेट करत आहेत. आजच्या आंदोलनावर ते काही बोलले नाहीत. मात्र आंदोलनाआधी दिलेल्या मुलाखतीत ते यावर बोलले होते. ‘ते मला राजा म्हणत आहेत, पण मी राजा नाही,’ असे ट्रम्प म्हणाले.