102 रुग्णवाहिका चालकांना मिळाला पाच महिन्यांचा पगार

102 रुग्णवाहिकांवरील कंत्राटी चालकांना गेल्या सहा महिन्यांपासून पगाराची फुटकी कवडीही मिळाली त्यांच्यावर उपासमारीची होती. याविरोधात दैनिक ‘सामना’ने आवाज उठवताच ठेकेदाराने तत्काळ चालकांच्या खात्यात पाच महिन्यांचा पगार जमा केला. आता रुग्णवाहिकाचालकांच्या कुटुंबांची दिवाळी गोड होणार आहे.

गावापांड्यातील दुर्गम भागातील रुग्णांसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका जीवनवाहिनी ठरली आहे. गर्भवती माता असो नाहीतर आपत्कालीन मदतीची वेळ असो या रुग्णवाहिका सज्ज असतात. संकटात धावणाऱ्या या चालकांवरच महायुती सरकारच्या काळात संकट कोसळले. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका काही वर्षांपूर्वी कार्यरत करण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे कंत्राट ठाणे जिल्हा परिषदेने मे. बरकत या कंपनीला दिले. मात्र या ठेकेदार कंपनीकडून गेल्या सहा महिन्यांपासून चालकांना फुटकी कवडीही दिली नव्हती. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा सवाल चालकांना पडला होता. संतप्त झालेल्या चालकांनी ठाणे जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता. मात्र दिवाळीपूर्वी पगार मिळेल असे सांगून आंदोलन थांबवण्यात आले.

सुटकेचा निःश्वास सोडला
दैनिक ‘सामना’ने ‘ठाण्यातील १०२ रुग्णवाहिकाचालकांची दिवाळी अंधारात’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. मे. बरकत कंपनीने याची गंभीर दखल घेऊन चालकांच्या खात्यात पाच महिन्यांचा पगार जमा केला. शहापूर तालुक्यात ८ रुग्णवाहिका चालक २४ तास सेवा देतात. या चालकांना पाच महिन्यांचा पगार मिळाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.