बिहार निवडणुकीत अंधश्रद्धेचा ‘काळा’बाजार! घुबड आणि मुंगसांनी भाव खाल्ला

बिहारमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत अंधश्रद्धेचा बाजार जोरात आहे. निवडणुका जिंकण्यासाठी तंत्रमंत्राचा आधार घेतला असून त्यासाठी दुर्मिळ घुबडे आणि मुंगसांचा वापर केला जात आहे. त्यामुळे पाटणा व आसपासच्या परिसरात या प्राण्यांची तस्करी वाढली आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी देवाचा धावा करण्याचे प्रकार सर्वत्र होत असतात. मात्र, बिहारमध्ये वेगळेच प्रकार सुरू आहेत. इथे घुबड आणि मुंगूस खरेदी केले जात आहेत. राजकीय नेत्यांचा यात मोठा सहभाग आहे. खुर्ची शाबूत राहावी म्हणून अनेक नेते घुबडाची पूजा करत आहेत. त्यात आता विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची भर पडली आहे. ’दैनिक भास्कर’च्या प्रतिनिधींनी केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून ही धक्कादायक माहिती समोर आली.

कसा ठरतो घुबडाचा भाव?

घुबडाची बोटे जितकी जास्त तितके ते फलदायी असे तस्कर सांगतात. त्यामुळे बोटांच्या संख्येवर घुबडांचा भाव ठरतो. 10 बोटांचे घुबड 2800 रुपयांत मिळते, तर 25 बोटांचे हिल स्टेशनवरचे दुर्मिळ घुबड 25 लाख रुपयांत मिळते. 25 बोटांच्या घुबडाची काळी जादू कधीच अपयशी ठरत नाही, असेही मानले जाते.

लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर काळी जादू

बिहारचे राजकारण नेहमी जात आणि प्रतिकांच्या भोवती फिरते. आता त्याला तंत्रमंत्राची जोड मिळाली आहे. सामान्य जनता लक्ष्मीपूजन करत असताना काही राजकीय लोक काळ्या घुबडाची पूजा करत होते, अशी माहिती समोर आली आहे. एक मुंगूस 2 हजार रुपयांत विकले जात आहे.