ट्रेंडिंग ‘कार्बाइड गन’ पडली महागात; दिवाळीत खेळताना १४ मुलांनी डोळे गमावले

carbide-gun-madhya-pradesh-news-14-children-go-blind-in-madhya-pradesh-playing-with-carbide-gun

प्रत्येक दिवाळीला फटाक्यांमध्ये काहीतरी नवीन ‘ट्रेंड’ येतो— कधी चक्री, कधी रॉकेट, तर कधी सुरसुरी. पण यावर्षीचा नवीन ट्रेंड मुलांसाठी घातक ठरला आहे. मुलांना आवडणारी ही ‘कार्बाइड गन’ किंवा ‘देसी फटाक्याची बंदूक’ यावर्षीची ‘मस्ट-हॅव’ वस्तू ठरली होती, पण तीच जीवघेणी ठरली.

फक्त तीन दिवसांत, मध्य प्रदेशात १२२ हून अधिक मुलांना डोळ्यांच्या गंभीर दुखापतींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यातील १४ मुलांनी आपले डोळे गमावले आहेत.

सर्वाधिक फटका विदिशा जिल्ह्याला बसला आहे. १० ऑक्टोबर रोजी सरकारने या क्रूड ‘कार्बाइड गन’वर बंदी घातली असूनही, स्थानिक बाजारात त्यांची राजरोसपणे विक्री सुरू होती.

फक्त १५० ते २०० रुपये किमतीची ही बंदूक खेळण्यांसारखी विकली जात होती, पण या बंदुकीचा स्फोट बॉम्बसारखा होतो.

भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात उपचार घेत असलेली सतरा वर्षांची नेहा म्हणाली, ‘आम्ही एक कार्बाइड गन विकत घेतली. जेव्हा तिचा स्फोट झाला, तेव्हा माझा एक डोळा पूर्णपणे जळाला. मला काहीही दिसत नाहीये.’

आणखी एक पीडित राज विश्वकर्मा याने सांगितले, ‘मी सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिले आणि घरीच फटाक्याची बंदूक बनवण्याचा प्रयत्न केला. ती माझ्या चेहऱ्या जवळच फुटली… आणि मी माझा एक डोळा गमावला.’

या बेकायदेशीर उपकरणांची विक्री केल्याबद्दल विदिशा पोलिसांनी सहा लोकांना अटक केली आहे. इन्स्पेक्टर आर.के. मिश्रा म्हणाले, “तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. या कार्बाइड गनची विक्री किंवा त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.’

भोपाळ, इंदूर, जबलपूर आणि ग्वाल्हेर येथील रुग्णालयांमध्ये डोळ्यांचे वॉर्ड या बंदुकांनी जखमी झालेल्या बालकांनी भरले आहेत. एकट्या भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात ७२ तासांत २६ मुलांना दाखल करण्यात आले आहे.

हे खेळणे नसून, बनावटी स्फोटक

हमीदिया रुग्णालयाचे सीएमएचओ डॉ. मनीष शर्मा म्हणाले, ‘या उपकरणांमुळे डोळ्यांचे थेट नुकसान होते. स्फोटामुळे धातूचे कण आणि कार्बाइडची वाफ बाहेर पडते, ज्यामुळे रेटिना जळून जातो. अनेक प्रकरणांमध्ये मुलांच्या बुबुळांना इजा झाली आहे, ज्यामुळे कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते.’