लेख – अफगाणिस्तान परराष्ट्रमंत्र्यांची भारत भेट

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

तालिबान राजवटीशी चीन आणि पाकिस्तानचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. चीन अफगाणिस्तानमधील दुर्मिळ खनिजे, दुर्मिळ मृदा घटक (Rare Earths) आणि नैसर्गिक संसाधने उत्खनन करत आहे. अमेरिकेलाही अफगाणिस्तानमध्ये पुन्हा सक्रिय होण्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीत भारतालाही आपल्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी तालिबानशी संबंध प्रस्थापित करणे अनिवार्य आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या भारत भेटीमुळे ही शक्यता वाढली आहे. 

गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमधील अंतर्गत सुरक्षा संबंधित हिंसाचारामध्ये पाकिस्तानी सैनिक मोठय़ा संख्येने मारले गेले आहेत. आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार, एकूण 18 हजार 160 हिंसाचाराच्या घटनांमध्ये 10 हजार 128 पाकिस्तानी सैनिक मृत्युमुखी पडले आहेत.  चार वर्षांत हा हिंसाचार आणखी वाढला आहे. फक्त 12 ऑक्टोबर 2025 पर्यंतच 848 हिंसक घटनांमध्ये 948 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

ताज्या संघर्षास कारणीभूत आहे पाकिस्तान. अफगाणिस्तानात अलीकडेच पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पन्नासहून अधिक निष्पाप महिला व बालकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर चिडलेल्या तालिबानने पाकिस्तानला कडाडून प्रत्युत्तर दिले . पाकिस्तान-अफगाणिस्तान यांना विभागणाऱ्या डय़ुरंड लाइनवरील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर तालिबानने केलेल्या हल्ल्यामध्ये साठहून अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. यामध्ये सर्व प्रकारची शस्त्रs, आर्टिलरींचा वापर केला  जात आहे.

पाकिस्तान अंतर्गत असंतोषाच्या ज्वालामुखीवर उभा आहे. बलुचिस्तानमध्ये विभक्त होण्यासाठीची नागरी चळवळ निर्णायक स्तरावर पोहोचली आहे. बलुच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानी सैन्यावर मोठे हल्ले केले जात आहेत. गिलगिट-बाल्टिस्तानमधील नागरिक पाकिस्तान सरकार व लष्कराच्या दंडेलशाहीला आणि चीनच्या वाढत्या प्रभावाला विरोध करत आहेत.

खैबर पख्तुनवा पेटला आहे. खैबर पख्तुनवा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरील प्रांत आहे. या भागात प्रामुख्याने पख्तुन लोकांचे वर्चस्व आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये 1893 मध्ये डय़ुरंड लाइन ब्रिटिशांनी आखलेली होती. अफगाणिस्तानला ही डय़ुरंड लाइन मान्य नाही.अफगाणिस्तानच्या अनेक टोळ्यांचे अस्तित्व खैबर पख्तुनवा भागात आहे. ते सातत्याने दावा करत आहेत की, हा संपूर्ण प्रदेश आमचा आहे.

वास्तविक तालिबानचा उदय पाकिस्तानच्या मदतीमुळे झाला. अफगाणिस्तानातून अमेरिकन फौजा मागे फिरल्यानंतर पाकिस्तानच्या मदतीनेच तेथे तालिबानचे शासन प्रस्थापित झाले. तालिबानच्या दहशतवाद्यांचा वापर भारताला रक्तबंबाळ करण्यासाठी करावा, असा पाकिस्तानचा त्या वेळी डाव होता, पण आज त्याच तालिबानने पाकिस्तानविरुद्ध शस्त्र उगारले आहे. दोन सुन्नी पंथीय देशांमध्ये संघर्ष  पेटला आहे.

अलीकडेच अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान यांनी भारताला भेट दिली. भारतीय परराष्ट्रमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा सुरू असतानाच पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक घडवून आणला.

तालिबानने पहिल्यांदा जेव्हा अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला होता तेव्हा भारतातील जम्मू आणि कश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला होता. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांना तालिबानचा पाठिंबा होता. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानसोबतचे संबंध तोडून टाकले होते. 2021 नंतर अफगाणिस्तानात दुसऱ्यांदा तालिबानचे शासन प्रस्थापित झाले त्या वेळी परिस्थिती बदललेली दिसून आली. भारताने अफगाणिस्तानात विकास प्रकल्पांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. हे विकासात्मक प्रकल्प पुढे सुरू राहावेत, तसेच अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानकडून भारतविरोधी कारवायांसाठी केला जाऊ नये ही यामागची प्रमुख भूमिका होती.

अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी स्पष्टपणाने सांगितले की, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांना आम्ही आमच्या भूमीवर पाय ठेवू दिलेला नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलपासून 30 किलोमीटर अंतरावर असणारा बगरामचा एअरबेस आम्हाला परत द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा अशी उघड धमकी अलीकडेच दिली आहे. या विमानतळाला मध्य आशिया आणि पश्चिम  आशियावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचे विमानतळ समजले जाते. इतकेच नव्हे, तर चीनचा शिनशियांग प्रांत आणि रशिया यांच्यावरही नजर ठेवता येते. त्यामुळे ट्रम्प बगराम विमानतळ ताब्यात घेण्याचा विचार करत आहेत.

मागील दशकात अमेरिकेने पाकिस्तानपासून पूर्णपणे फारकत घेतली होती, पण आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख, पंतप्रधान ‘व्हाईट हाऊस’मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना भेटत आहेत. मागील महिन्यात पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी तीनवेळा अमेरिकेला भेटी दिल्या. बगरामबाबत तालिबानची मनधरणी करण्याची जबाबदारी जनरल आसीम मुनीर यांना देण्यात आली, पण तालिबानने त्यास पूर्णपणे नकार दिला. आम्ही एक इंचही जमीन अमेरिकेला देणार नाही, असे स्पष्ट केले. भारतानेसुद्धा अमेरिकेच्या विरोधात जाऊन तालिबानच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

आता भारताचा तालिबानकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. काबूलमधील भारतीय दूतावास पुन्हा सुरू होणार आहे. अफगाणी सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय सैन्य, भारतीय वायुदल पुन्हा अफगाणिस्तानात जाऊ शकतात. तसेच बगराम विमानतळावर भारतीय विमाने उतरू शकतात. तसे झाल्यास तो पाकिस्तानसाठी खूप मोठा धक्का असेल. याला ‘ऑपरेशन सिंदूर- भाग दुसरा’ म्हणता येईल.  अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलाना आमीर खान मुत्तकी यांचा भारत दौरा एकाएकी घडलेली घटना नसून  अफगाणिस्तानशी सर्व पातळीवर संबंध सुधारण्याच्या भारताच्या पद्धतशीर प्रयत्नांचा तो भाग आहे.

अफगाण परराष्ट्रमंत्री आमीर खान यांच्या भारत  भेटीमुळे अफगाणिस्तानच्या दिल्लीमधील दूतावासात अफगाणिस्तानचा जुना झेंडा जाऊन तालिबानचा झेंडा फडकू लागला. दोन्ही देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर राखण्यावर भर दिला. अफगाण परराष्ट्रमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की, अफगाण सरकार भारताविरुद्ध कोणत्याही गटाला किंवा व्यक्तीला अफगाणिस्तानची भूमी वापरू देणार नाही.

[email protected]