समाजभान – विवाहपूर्व समुपदेशन काळाची गरज

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी, [email protected]

सध्या नवीन लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये सुसंवाद घडण्याऐवजी विसंवादच जास्त घडत आहे आणि हा विसंवाद पुढे घटस्फोटास कारणीभूत ठरावा इतका दाहक ठरत आहे. याची इतरही कारणे असली तरी या तरुणवर्गात लैंगिक संबंधांबाबत विवाहपूर्व समुपदेशन न होणे हेही एक कारण आहे.

एक 25 ते 27 वर्षांचा मुलगा दवाखान्यात वेटिंगमध्ये बराच वेळ नंबर आला तरी मागे राहून वाट पाहत होता. सर्व पेशंट झाल्यावर आत आला तेव्हाच मी ओळखले, काहीतरी वेगळी समस्या आहे.

मी विचारलं,  तुझे नाव काय? काय करतो? इत्यादी प्रश्न विचारून त्याला जरा बोलता केला. तेव्हा त्याने सांगितले की, लग्न होऊन सहा महिने झाले. अजून पुढे काहीच प्रगती नाही.’

‘अच्छा ठीक आहे. पाहू काय करता येईल का ते?’ असे म्हणत बराच संवाद झाला. नंतर त्याच्या पत्नीला बोलावून दोघांबरोबर संवाद साधला. दोघांनाही योग्य सल्ला दिला आणि मोडण्यापर्यंत आलेले लग्न वाचले.

असे का व्हावे याचे कारण आपल्याकडे लग्नापूर्वीच्या समुपदेशनाविषयी जागरूकता नाही. इंटरनेट, मित्रमंडळींचे अर्धवट सल्ले आणि भोंदू सेक्सोलॉजिस्टनी मांडलेला बाजार यामुळे आजची पिढी भरडली जात आहे. विशेषत ग्रामीण भागात त्याची झळ अधिक लागत आहे . इंटरनेटमुळे प्रचंड गैरसमज पसरवले आहेत. इंटरनेटवर बघून तरुण पिढीत नैराश्य, नवराबायकोमधील भांडणे आणि शेवटी लग्न मोडणे याचे प्रमाण वाढत चालले आहे. याला उपाय एकच, योग्य तज्ञांकडून समुपदेशन!

भोंदू सेक्सोलॉजिस्ट बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या देऊन लघवीतून दोष बाहेर पडेल असे सांगून प्रचंड पैसा उकळतात. वेळीच सावधानता बाळगून अशांना टाळणे गरजेचे आहे. यासाठीच फॅमिली डॉक्टर हवा असा आग्रह मी धरतो.

‘कन्या देऊनीया कुळ मग काय विचारावेत’, अशी गत होऊ नये यासाठी दोघांच्याही हिमोग्लोबिन, एचआयव्हीसी रूबेला, सिकलसेलसारख्या रक्ताच्या चाचण्या करून घेणे योग्य ठरेल. विवाहानंतर कामजीवन योग्य व्हावे यासाठी लैंगिक संबंधांविषयी स्त्राr-पुरुष दोघांनाही शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे सोशल मीडिया बघून होणारे गैरसमज टाळता येतील.

पूर्वीसारखी अनेक मुले जन्माला घालणे आजच्या पिढीला शक्य नाही. एक किंवा दोन मुले आरोग्यपूर्ण सुदृढ व्हावीत याकरिता गर्भधारणा चांगल्या ऋतूत, काळात व्हावी, आई-वडिलांचा आहार विहार योग्य असावा, आवश्यकता असल्यास पंचकर्मसारख्या चिकित्सांनी वाढलेले दोष निचरा करून निरोगी शरीरातून नवीन आरोग्यपूर्ण निर्मिती व्हावी हेच या समुपदेशनाचे उद्दिष्ट आहे.

 गर्भनिरोधनाच्या अनेक पद्धती आहेत. त्याचाही शास्त्रोक्त अभ्यास या समुपदेशनात करता येते. यामुळे नवीन जोडप्यासमोर येणाऱया अडचणी कमी होतील. गर्भधारणा झाल्यास गर्भपातासारखा पर्याय निवडला जातो. तोही खर्चिक आणि धोकादायक होऊ शकतो. हे सर्व टाळण्यासाठी गर्भनिरोधनाचे पर्याय समजून घेणे आवश्यक ठरते.आणखी एक सर्वसाधारण गैरसमज म्हणजे रक्तगट! मुलगा व मुलगी यांचा रक्तगट समान असल्याने कुठलाही धोका नाही. तसेच मुलीचा रक्तगट निगेटिव्ह असण्याने मूल होत नाही हा निव्वळ गैरसमज आहे. मुलाचे वय 21 वर्षे व मुलीची 18 वर्षे पूर्ण असणे हेही कायद्याच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे असे अनेक मुद्दे समुपदेशनाने समजावून देता येतात.