
>> अभय मिरजकर
चाकूर येथील रामदास भानुदास शास्त्री यांनी केलेले कार्य एखाद्या नाटक अथवा चित्रपटातील कथानकाप्रमाणे किंवा एखाद्या परिकथेतील गोष्टीप्रमाणेच वाटते. तीन वर्षांच्या काळात तब्बल 143 नारदीय कीर्तन तर केलेच, पण कीर्तन भूषण पुरस्काराने गौरवण्यातही आले.
चाकूर येथे 1810 ते 1875 या कालावधीत विठ्ठल शास्त्री महाराज उपाख्य विष्णवानंद सरस्वती स्वामी महाराज हे संत होऊन गेले. त्यांनी भागवत संहिता वाचन परंपरा आणि नारदीय कीर्तन परंपरा पाळली. विठ्ठल शास्त्री यांचे काव्य हे पंत काव्य, तंत काव्य आणि संत काव्य या तीन प्रकारात मोडणारे आहे. या घराण्यात जन्माला आलेले रामदास भानुदास शास्त्री चाकूरकर यांनी 1984 मध्ये विद्युत पदविका घेतली. 10 वर्षे औद्योगिक क्षेत्रात काम केले. जपान येथे प्रशिक्षण घेतले व तब्बल 22 वर्षे वैद्यकीय क्षेत्रात उपकरणांची विक्री व दुरुस्तीचे काम केले.
200 वर्षांची वाचन परंपरा
शास्त्री ज्यांच्या मठामध्ये 200 वर्षांपासूनची नित्य भागवत संहिता वाचन परंपरा सुरू आहे. भागवत संहिता वाचन परंपरा वडिलांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे रामदास शास्त्री यांनी पत्करली. केवळ रामरक्षा पठणापुरताच रामदास शास्त्री यांचा संबंध आलेला होता. भागवत संहिता वाचन कसं जमणार हा मुख्य प्रश्न होता. बाहेरून कोणी भागवतकार यायला तयार नव्हता. शेवटी वडिलांनी आदेश दिला तूच भागवत संहिता वाचन कर व भागवत सांग. तब्बल एक महिना भागवत कथा सांगण्याचे काम त्यांनी केले. विठ्ठल शास्त्री महाराज यांनी लिहिलेली 25 आख्याने असणारी वही वडिलांनी हातात दिली व नारदीय कीर्तन परंपरा पुढे चालवावी असे सांगितले. विठ्ठल शास्त्री महाराजांच्या साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी रामदास शास्त्री यांनी ही नारदीय कीर्तन परंपरा पुढे सुरू केली. ना कीर्तनाचे शिक्षण घेतलेले ना संगीताचे धडे गिरवलेले. परंतु थेट गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त परभणी येथे गालव्य आख्यानावर पहिले नारदीय कीर्तन केले आणि ही परंपरा पुढे चालू झाली. 27 ऑक्टोबर 2025 रोजी श्री विठ्ठल शास्त्री महाराज यांच्या 151 वी पुण्यतिथी निमित्त रामदास शास्त्री चाकूरकर यांचे 151 वे नारदीय कीर्तन होत आहे. 2025 मध्ये झालेल्या कीर्तन संमेलनातही त्यांना कीर्तन सेवा करण्याचा मान मिळाला व त्यांना कीर्तन भूषण ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.





























































