
निवडणूक अधिकारीच पैसे घेऊन मतदार यादीत नावे घुसवतात, असा आरोप भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केल्यानंतर नवी मुंबईतील मनसे आक्रमक झाली आहे. म्हात्रे यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करावी तसेच बोगस नावे यादीत घुसवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून दोषींना अटक करावी, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. नवी मुंबईत मतदार यादीच विक्रीला काढली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मतदार याद्यांमधील घोळ शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेने चव्हाट्यावर आणल्यानंतर निवडणूक अधिकारी व कर्मचारी हादरले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीदेखील पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांमधील घोटाळ्यांचा पर्दाफाश केला. आता सत्ताधारी पक्षातील आमदारदेखील आयोगाच्या कारभारावर टीका करत आहेत. आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईत निवडणूक आयोगाचे अधिकारी पैसे घेऊन बोगस मतदारांची नावे नोंदणी करतात, असा गंभीर आरोप केला होता.
‘ते’ अधिकारी कोण?
मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज यासंदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेत अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काळे म्हणाले की, एका आमदाराने निवडणूक आयोगावर आरोप करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. पैशाच्या मोबदल्यात मतदार यादीमध्ये बोगस नावे घुसवणारे अधिकारी कोण हे शोधून काढा. तसेच अशा किती नावांचा समावेश करण्यात आला याचीदेखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
…तर अनेक बाबी उघडकीस येतील
कर्नाटक राज्यामध्ये प्रत्येकी ८० रुपये घेऊन बोगस नावे मतदार यादीत टाकली असल्याचे पुरावे समोर आले आहेत. नवी मुंबईतदेखील अशा प्रकारचे गुन्हे नोंदवले गेले तर चौकशीत अनेक बाबी उघडकीस येतील, असेही गजानन काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.































































