
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 1419 रहिवाशांचा लवकरच नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे. या रहिवाशांना डिसेंबरअखेरपर्यंत नव्या घराचा ताबा देण्यासाठी म्हाडाने कंबर कसली आहे. त्यादृष्टीने उर्वरित सहा विंगमधील अंतर्गत आणि फिनिशिंगची कामे वेगाने सुरू आहेत. यामुळे वर्षानुवर्षे 160 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना 500 चौरस फुटांचे घर मिळणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे अंमलबजावणी करण्यात येत आहे. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे 121 जुन्या चाळींतील 9 हजार 689 रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. येथे 40 मजल्यांच्या 34 पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहेत. या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याअंतर्गत उभारलेल्या इमारत क्र. 1 मधील ‘डी’ व ‘ई’ विंगमधील 556 रहिवाशांना ऑगस्टमध्ये घराचा ताबा देण्यात आला आहे.
आता उर्वरित सहा विंगचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी म्हाडाने कंबर कसली आहे. सहापैकी ‘ए’ विंगच्या फिनिशिंगचे काम सध्या सुरू आहे. उर्वरित विंगचे फिनिशिंगचे काम पूर्ण झाले असून वॉटर कनेक्शन, सिव्हरेज, इलेक्ट्रिकल, लिफ्ट सर्टिफिकेशन अशी अंतर्गत कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून डिसेंबरअखेरपर्यंत आणखी 1419 रहिवाशांना ताबा देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे, असे सूत्रांनी सांगितले.
नायगावमधील 864 जणांचा लवकरच गृहप्रवेश
नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील 864 कुटुंबीयांचादेखील नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे. पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारत क्र. 8 मधील टॉवर क्र. 4 ते 8 या पाच इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. या रहिवाशांना दिवाळीत घरे देण्याचे म्हाडाचे नियोजन होते. त्यादृष्टीने म्हाडाने तयारी केली होती, परंतु अग्निशमन दलाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी या इमारतींची पाहणी केली असता काही बदल सुचवले आहेत. हे काम पूर्ण होताच ओसीसाठी अर्ज केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.






























































