
पावसाळ्यातील विश्रांतीनंतर माथेरानची राणी पुन्हा एकदा झोकात धावणार आहे. दसरा त्यानंतर दिवाळीचाही मुहूर्त हुकलेली टॉय ट्रेन आता १ नोव्हेंबरला प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, अशी घोषणा प्रशासनाने केली आहे. ठरल्याप्रमाणे आठ दिवसात माथेरानची राणी रुळावर आल्यास हजारो पर्यटकांना दऱ्याखोऱ्यातून निसर्गाचा मनमुराद आनंद घेत नेरळ ते माथेरान प्रवास करता येणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात दगड, मातीचा मलबा रेल्वे ट्रॅकवर येतो. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नेरळ-माथेरान टॉय ट्रेन बंद ठेवली जाते. केवळ अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवाच सुरू असते. त्यामुळे हजारो पर्यटकांना पावसाळ्यात रस्तेमार्गे माथेरान गाठावे लागते. यंदा रुळाच्या डागडुजीच्या कामाला उशीर झाल्याने टॉय ट्रेन नेहमीपेक्षा एक ते दीड महिना उशिरा धावणार आहे. आधी दसऱ्याला टॉय टेन सरू होईल अशी घोषणा केली होती. त्यानंतर १६ ऑक्टोबरचा वायदा करण्यात आला होता. मात्र ही तारीखदेखील हुकली. आता १ नोव्हेंबरला माथेरानची राणी रुळावर येईल अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी दिली आहे.
लवकरच ट्रायल
नेरळ स्थानकाचे स्टेशन मास्तर गुरुनाथ पाटील यांनी माथेरान मार्गावरील रेल्वे स्थानकांची पाहणी केली. काही महत्त्वाची कामे मार्गी लागल्यानंतर माल वाहू ट्रेनची ट्रायल घेतली जाईल. त्यानंतर पर्यटकांची लाडकी माथेरानची राणी सेवेत दाखल होणार आहे.
























































