कसाऱ्यात हद्द झाली राव; अवजड वाहनांच्या घुसखोरीसाठी हाईट बॅरिगेट कटर मशीनने कापला, मोखावणे मार्गावरील ब्रिटिशकालीन पुल कोसळण्याचा धोका

कसारा-मोखावणे गावाला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलावरून अवजड वाहनांची बेकायदा वाहतूक सुरू आहे. धक्कादायक म्हणजे अवजड वाहनांची घुसखोरी थांबवण्यासाठी लावण्यात आलेला हाईट बॅरिगेट समाजकंटकांनी कटर मशीनच्या मदतीने कापला आहे. त्यामुळे हा ब्रिटिशकालीन पूल धोकादायक झाला असून तो कोसळण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

कसारा-मोखावणे गावाला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल धोकादायक झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दीड कोटी रुपये खर्च करून त्या पुलाची डागडुजी केली. मात्र दुरुस्तीच्या कामानंतर हा पूल अनेक वर्ष बंद होता. अखेर ग्रामस्थांना दिलासा देत प्रशासनाने लहान वाहनांसाठी हा रस्ता सुरू केला. या पुलावरून जड अवजड वाहनांची वाहतूक होऊ नये यासाठी प्रशासनांकडून हाईट बॅरीगेट लावण्यात आले. मात्र काही समाजकंटकांनी या पुलावरील बॅरिगेट कापून बाजूला केले. या अवजड वाहनांमुळे स्थानिकांची सुरक्षा धोक्यात आली असून पुलालाही धोका निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे. त्यामुळे पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करून ही बेकायदा वाहतूक थांबवावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

रेती, खडी, डबर, सिमेंटची वाहतूक

कसारा येथील टेकडीवर विकासकांकडून कामे सुरू आहेत. तेथील रेती, खडी, डबर, सिमेंटची वाहतूक या पुलावरून केली जात आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासक अवजड वाहनांची वाहतूक पुलावरून करत असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.