
‘फलटणमधील डॉक्टर तरुणीचा मृत्यू ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. सत्तेचे सुरक्षाकवच लाभलेल्या गुन्हेगारी विचारधारेचे हे सर्वात घृणास्पद रूप आहे,’ असा घणाघाती हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला.
‘एक्स’वर पोस्ट करून राहुल गांधी यांनी फलटण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘बलात्कार आणि छळाला कंटाळून एका डॉक्टर तरुणीने केलेली आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत व विवेकी समाजाला हादरवून टाकणारी एक शोकांतिका आहे. इतरांचे दुःख हलके करण्याची इच्छा बाळगणारी एक होतकरू डॉक्टर भ्रष्ट व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाचा बळी ठरली हे दुर्दैवी आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे.
‘न्यायाच्या लढाईत आम्ही पीडितेच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत. हिंदुस्थानच्या प्रत्येक मुलीच्या पाठीशी आहोत. आता घाबरणार नाही, आम्हाला न्याय हवा आहे,’ असे राहुल यांनी ठणकावले आहे.
भाजपचा अमानवी चेहरा समोर आला!
‘गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनीच सर्वात घृणास्पद गुन्हा केला. निष्पाप महिलेवर बलात्कार केला. तिचे लैंगिक शोषण केले. भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्नही केला, अशा बातम्या आहेत. सत्ता जर गुन्हेगारांना संरक्षण देत असेल तर न्यायाची अपेक्षा कोणी कशी करू शकतो,’ असा सवाल राहुल यांनी केला. ’डॉक्टर तरुणीच्या मृत्यूमुळे भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी चेहरा समोर आला आहे,’ असेही ते म्हणाले.
























































