
ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या वनडे लढतीत हिंदुस्थानचा स्टार खेळाडू आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर जायबंदी झाला होता. त्यामुळे त्याला सामना अर्धवट सोडून मैदानाबाहेर जावे लागले होते. आता त्याच्या तब्येतीबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. झेल घेताना श्रेयस अय्यर पोटावर आदळला होता आणि यामुळे अंतर्गत रक्तस्राव झाला. त्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. फिट होऊन मायदेशी परतण्यासाठी त्याला एक आठवडा रुग्णालयात काढावा लागणार आहे.
Medical update on Shreyas Iyer. Details 🔽 #TeamIndia | #AUSvIND https://t.co/8LTbv7G1xy
— BCCI (@BCCI) October 27, 2025
नेमके काय घडलेले?
ऑस्ट्रेलियाच्या डावातील 34 वे षटक हर्षित राणा टाकत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर अॅलेक्स कॅरी याने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूने बॅटची कड घेतली आणि उंच उडाला. याचवेळी बॅकवर्ड पॉइंटच्या मागून धावत आलेल्या श्रेयस अय्यर याने सूर मारून झेल पकडला. हा झेल घेताना तो पोटावर आदळला. यामुळे त्याला दुखापत झाली. तीव्र वेदनेने तो कळवळू लागला. अय्यरने झेल घेतल्याने कॅरी 24 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर अय्यरलाही मैदान सोडावे लागले.


























































