
हिंदुस्थानची दोन वेळा ऑलिंपिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जोरदार पुनरागमनाच्या तयारीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पायाच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरता न आल्यामुळे तिने 2025 बीडब्ल्यूएफ टूरमधील उर्वरित सर्व स्पर्धांतून माघार घेतली आहे.
सिंधूने सांगितले की, हा निर्णय तिने आपल्या सपोर्ट स्टाफ आणि प्रसिद्ध क्रीडावैद्यक तज्ञ डॉ. दिनशॉ पारडीवाला यांच्याशी सविस्तर चर्चेनंतर घेतला. सिंधू म्हणाली, डॉ. पारडीवाला आणि माझ्या टीमच्या सल्ल्यानुसार उर्वरित सत्र न खेळणे योग्य वाटले. युरोप दौऱ्यापूर्वी झालेली पायाची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. निर्णय कठीण होता, पण दुखापती या खेळाडूंच्या प्रवासाचा भाग आहेत. त्या आपल्या जिद्दीची परीक्षा घेतात आणि आपल्याला अधिक मजबूत बनवतात.
सिंधू सध्या पूर्ण लक्ष पुनर्वसन आणि फिटनेस प्रशिक्षणावर केंद्रित करत आहे. तिच्यासोबत डॉ. वेन लोम्बार्ड, निशा रावत, चेतना आणि प्रशिक्षक कार्यरत आहेत. माझ्या टीमचा विश्वास मला दररोज नवी ताकद देतो. मी आभारी आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक प्रेरित झाले आहे, असे ती म्हणाली.
सिंधूसाठी 2025 चा मोसम अधिक आव्हानात्मक ठरला. तिने चायना मास्टर्स सुपर 750, इंडिया ओपन सुपर 750 आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली, मात्र सातत्य राखता आलं नाही. सिंधूने 2026 च्या जानेवारीत कोर्टवर पुनरागमन करण्याचा विश्वास व्यक्त करत चाहत्यांना ‘अधिक दमदार सिंधू पाहण्याचे’ आश्वासन दिलं आहे.






























































