भाजपला मतदान करूनही आमचे हाल, परभणीत शेतकर्‍याने जिल्ह्याधिकार्‍यांची गाडी फोडली!

देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा करण्याची हमी दिली होती. अतिवृष्टीग्रस्तांना १८,५०० रुपये दिवाळीपूर्वी मदत देणार म्हणून सांगितले होते. दिवाळी उलटून गेली तरी अजून खडकू मिळाला नाही. भाजपला मतदान करूनही आमचे हाल! काय चुकलं आमचं, असा संतप्त सवाल करीत परभणीत एका शेतकर्‍याने जिल्हाधिकार्‍यांची गाडी फोडली. मला गोळी घातली तरी चालेल पण कर्जमाफी झाली पाहिजे असेही त्याने ठणकावून सांगितले.

मराठवाड्यात अतिवृष्टीने हाहाकार उडवला. परभणी जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, मका, उडदासह फळबागा नेस्तनाबूत झाल्या. खरीपाचा एक दाणाही शेतकर्‍यांच्या हाती लागला नाही. महापुराच्या तडाख्याने हजारो हेक्टर जमिनी खरवडून गेल्याने रबीचा हंगाम कसा घ्यायचा असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणा भीमदेवी थाटात ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. दिवाळीपूर्वीच मदत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होईल असे छातीठोकपणे फडणवीस सांगत होते. परंतु सरकारची तिजोरीच रिकामी असल्याने शेतकर्‍यांना खडकूही मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड संताप असून हा उद्रेक आता बाहेर पडत आहे.

मदत न मिळाल्याने संतापलेल्या शेतकर्‍याने काल नांदेड जिल्ह्यात तहसीलदाराची गाडी फोडली. आज दुपारी संतोष पैके या शेतकर्‍याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभ्या असलेल्या जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या शासकीय गाडीवर दगड घातला. पोलीस उपनिरीक्षक अशोक उप्पड, अंमलदार हनुमान कच्छवे, सय्यद लाला, दिनेश काळे आदींनी संतोष पैके यांना लगेच ताब्यात घेतले. संतोष पैके हे पालम तालुक्यातील चाटोरी गावचे रहिवासी आहेत.

गोळी घातली तरी हरकत नाही

पोलिसांनी ताब्यात घेतलेले संतोष पैके हे अतिवृष्टीची मदत न मिळाल्याने भयंकर संतापले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा करणार म्हणून सांगितले होते. त्यामुळे आम्ही भाजपला मतदान केले. दिवाळीपूर्वी अतिवृष्टीची मदत मिळणार होती. परंतु ती देखील मिळाली नाही. आम्ही भाजपला मतदान केले, आमचे काय चुकले, मला गोळ्या घातल्या तरी हरकत नाही पण कर्जमाफी झालीच पाहिजे असे संतोष पैके यांनी ठणकावून सांगितले.