
जगज्जेता हिंदुस्थानी गुकेश डोमराजूने क्लच चेस चॅम्पियन्स शोडाऊन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आपले वर्चस्व दाखवले. 19 वर्षीय या ग्रॅण्डमास्टरने सहा डावांमधून चार गुणांची कमाई करत आघाडी घेतली. सुरुवातीला मॅग्नस कार्लसनविरुद्ध थोडा अस्थिर दिसलेला गुकेश नंतर तीन विजय आणि दोन बरोबरीसह पुन्हा आत्मविश्वासात परतला आणि जागतिक बुद्धिबळातील आपली वाढती ताकद अधोरेखित केली. कार्लसनने दोन विजय आणि दोन बरोबरींसह दमदार सुरुवात केली होती, मात्र हिकारू नाकामुराविरुद्ध पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना त्याला पराभव स्वीकारावा लागला आणि त्यामुळे तो गुकेशच्या थोडा मागे राहिला. नाकामुरा सध्या तीन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर फाबियानो करूआना 1.5 गुणांसह आणखी मागे आहे. मात्र गुणतालिकेतील नंबरपेक्षा अधिक चर्चा रंगली ती गुकेश-नाकामुराच्या लढतीची.































































