भिवंडीत वृद्धेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या

शेतावर गेलेल्या एका वृद्धेवर काही नराधमांनी अत्याचार करून नंतर तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडी तालुक्याच्या चावेभरे या गावात घडली आहे. या घटनेमुळे वृद्ध महिलेचे कुटुंब हादरले असून दोषींना त्वरित अटक करा, अशी मागणी करण्यात आली आहे.

चावेभरे या गावात वृद्ध महिला आपल्या कुटुंबासमवेत राहत होती. नेहमीप्रमाणे ती आज दुपारी बाराच्या सुमारास आपल्या शेतावर कामासाठी गेली. त्यावेळी काही जणांनी तिच्यावर अत्याचार केले. एवढेच नव्हे तर त्याच शेतातील दगडाने ठेचून वृद्धेची हत्या केली. ही हत्या केल्यानंतर सहा तोळ्याचे दागिनेदेखील लांबवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हा प्रकार समजताच गणेशपुरी पोलीस ठाण्यातील पथकाने चावेभरे गावाकडे धाव घेतली. ही घटना घडल्यानंतर परिसरातून तीनजण पळून जात असल्याचे काही जणांनी पाहिल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत असून अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी वकील संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. किरण चन्ने यांनी केली आहे.