अमित शहांना अ‍ॅनाकोंडा म्हटल्याने मिंधेंची आदळआपट

शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ‘अ‍ॅनाकोंडा’ची उपमा दिली होती. उद्धव ठाकरे यांची ही टीका भारतीय जनता पक्षापेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिक झोंबली आहे. ‘शहा अ‍ॅनाकोंडा नाहीत’ म्हणत शिंदेंनी आज या टीकेला तत्परतेने उत्तर दिले. यावरून ‘टीका शहांवर आणि आदळआपट मिंधेंची’ अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटल्या आहेत.

‘मुंबई विकणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही जुनी कॅसेट आहे. शहा मुंबईकरांना देण्यासाठी आले होते, मुंबईकडून काही घेण्यासाठी आले नव्हते. त्यामुळे त्यांना अ‍ॅनाकोंडा म्हणणे चुकीचे आहे,’ असे सांगत शिंदे यांनी शहांचा स्तुतीपाठ गायला.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे…

‘अ‍ॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप. तो आज मुंबईत येऊन गेला. भाजप कार्यालयाचं भूमिपूजन करून गेला. त्याला मुंबई गिळायची आहे. पण तो मुंबई कशी गिळतो ते मी बघतोच! नाही त्याचं पोट फाडून आलो तर नावाचा नाही,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर तोफ डागली होती. संयुक्त महाराष्ट्र लढय़ात मराठी माणसांना गोळय़ा घालण्याचा आदेश देणारे मोरारजी देसाई हे गुजरातीच होते. गोळय़ा घालून मराठी माणूस झुकत नाही हे लक्षात आल्यावर आता पैसे देऊन मुंबई ताब्यात घेण्याचा दिल्लीत बसलेल्या दोन व्यापाऱयांचा प्रयत्न आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.