फोन करणाऱ्या अनोळखी कॉलरचे नाव दिसणार, देशात लवकरच सीएनएपी  सेवा सुरू होणार

स्मार्टफोनवर स्पॅम कॉल्सचे टेन्शन अनेकांना आहे. रात्री-अपरात्री अनोळखी नंबरवरून फोनवर कॉल्स येतात. हा नंबर नेमका कोणाचा आहे आणि तो कशाला फोन करतोय असे प्रश्न पडतात, परंतु आता लवकरच हे टेन्शन दूर होईल. देशात सीएनएपी सेवा सुरू केली जाणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर अनोळखी नंबरवरून फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोबाइलवर दिसणार आहे. त्यामुळे हा फोन कोण करतेय, हे आधीच समजेल. त्यामुळे फोन उचलण्याची गरज भासणार नाही. तसेच स्पॅम कॉल आहे हेही स्पष्ट होईल.

अज्ञात किंवा अनोळखी नंबरपासून सुटका करण्यासाठी मोबाइलधारक फोन न उचलणे किंवा संबंधित नंबर ब्लॉक करणे असे पर्याय निवडतात. मात्र आता अनोळखी कॉलचे टेन्शन जाणार असून अज्ञाताचे नाव तुमच्या मोबाइल स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे तुमच्या मोबाइलवर कॉल आल्यानंतर आता नंबरसमवेत संबंधित व्यक्तीचे नावही झळकणार आहे. मोबाइलवर कॉलिंग नेम प्रेझेन्टेशन सर्व्हिस म्हणजे सीएनएपी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. येत्या 7 दिवसांत किमान एका सर्कलमध्ये तरी ही सीएनएपी सेवा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे मोबाइलवर येणारे स्पॅम कॉल्सद्वारे  फसवणूक टाळता यईल.

सेवा देणे बंधनकारक

ट्रायच्या शिफारसीनुसार, सीएनएपीची सेवा देणे सर्व टेलिकॉम कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या ट कॉलरवर ही सेवा मिळते, परंतु ट कॉलर ही थर्ड पार्टीची सेवा असल्याने अनेक जण ही सेवा वापरत नाही. परंतु आता ट्रायने सांगितल्यानुसार, टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि सरकारी कंपनी बीएसएनएल यासारख्या कंपन्यांना ही सेवा पुरवावी लागणार आहे. कॉलरवर समोरच्या व्यक्तीचे नाव दिसणे आवश्यक आहे.