सामना अग्रलेख – बनवाबनवीचा खेळ; स्वाभिमानाचा खेळखंडोबा!

पंतप्रधान मोदी सध्या ज्या ज्या देशांना ‘मित्र’ म्हणत आहेत, ज्या ज्या राष्ट्रप्रमुखांशी गळ्यात गळे घालून भारताच्या राष्ट्रीय हिताचे संरक्षण केल्याचा आव आणत आहेत, तो प्रत्येक देश भारताशी ‘डबल गेम’ खेळत आहे. रशिया-चीनपासून सौदी-ब्रिटनपर्यंत सर्वच देश एकीकडे मोदींशी ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ करीत आहेत आणि दुसरीकडे भारताच्या राष्ट्रीय हिताचा गळा चिरणारे करार पाकिस्तान, बांगलादेश, तुर्की आदी देशांसोबत करीत आहेत. भारतासोबत जग ‘बनवाबनवी’चा खेळ खेळत आहे आणि मोदी सरकार देशाच्या स्वाभिमानाचा खेळखंडोबा करीत आहे!

अमेरिकेने लादलेले ‘टॅरिफ वॉर’ आणि इतर दबाव यापुढे मोदी सरकार कसे झुकलेले नाही आणि भारताच्या राष्ट्रीय हिताचे कसे रक्षण करीत आहे, असे एक चित्र सध्या आपल्या देशात निर्माण करण्यात आले आहे. त्यासाठी सरकार आणि भक्त मंडळी रशिया, चीनसह इतर देशांशी भारत करीत असलेल्या व्यापार करारांचे दाखले देत आहेत. प्रत्यक्षात वास्तव हेच आहे की, मोदी सरकार ज्या ज्या देशांशी व्यापार करार करीत आहे तो तो देश नंतर भारताच्या शत्रू राष्ट्रांशीही करार करून मोदी सरकार आणि भक्त मंडळींच्या दाव्यातील हवा काढून घेत आहे. पंतप्रधान मोदी ज्या देशांच्या पंतप्रधानांची गळाभेट घेतात तेच देश मोदींची पाठ फिरल्यावर पाकिस्तान, बांगलादेश, तुर्की वगैरे भारताच्या शत्रूंशी करार करतात. ब्रिटनने तीन आठवड्यांपूर्वी भारताशी सुमारे 3 हजार 884 कोटी रुपयांचा आर्थिक आणि संरक्षणविषयक करार केला. ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर आणि पंतप्रधान मोदी यांनी 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत या करारावर सह्या केल्या. या कराराचे वर्णन मोदी सरकार आणि समर्थकांनी ऐतिहासिक वगैरे केले होते. दोन्ही देशांमधील ‘कॉम्प्लेक्स वेपन्स पार्टनरशिप’च्या दिशेने मोठी झेप, असे या कराराबद्दल सांगितले गेले. मात्र ही झेप होण्याआधीच ब्रिटनने पाकिस्तानचा नंबर एकचा मित्र असलेल्या तुर्कीशी जवळपास 10.7 अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार केला आहे.

तुर्कीसोबतच्या कराराने

मोदी सरकारच्या दाव्याची पुरती पोलखोल झाली आहे. कारण तुर्की हा पाकिस्तानचा मित्र म्हणजे भारताचा शत्रूच आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानचे सर्वप्रथम उघडपणे समर्थन करणारा, पाकड्यांना ड्रोन पुरविणारा तुर्कीच होता. मोदी सरकारच्या तथाकथित स्वाभिमानी बाण्याची ऐशी की तैशी करणारा ब्रिटन हा एकमेव देश नाही. ज्या पुतीन यांच्याशी मोदींचे ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ सुरू आहे त्या रशियानेही याच महिन्यात पाकिस्तानसोबत एक महत्त्वाचा संरक्षण करार केला. त्यानुसार रशिया-पाकिस्तानच्या जेएफ-17 थंडर लढाऊ विमानांसाठी ‘आरडी-93 एमए’ इंजिन पुरविणार आहे. मुख्य म्हणजे भारताच्या तीव्र विरोधाला कचराकुंडीत फेकून रशियाने हा करार केला. भारत अमेरिकेच्या दबावाला झुगारून रशियाकडून तेल खरेदी करीत आहे, वगैरे विचार रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केला नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. तीच गोष्ट सौदी आणि चीनचीही आहे. सौदीचे राजपुत्र प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे पंतप्रधान मोदी यांचे खास मित्र आहेत, असे मोदीभक्त सांगत असतात. मात्र त्यांच्या या खास मित्राने गेल्या महिन्यात पाकिस्तानशी महत्त्वाचा करार करून ही मैत्री खुंटीला टांगून ठेवली! या करारामुळे सौदी किंवा पाकिस्तानवरील हल्ला दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाणार आहे. मोदी सरकारच्या तथाकथित

कूटनीतीचे वस्त्रहरणच

या कराराने केले. वास्तविक इंधनाच्या क्षेत्रात सौदी अरेबियाकडे भारताएवढी महत्त्वाची बाजारपेठ दुसरी कुठलीच नाही, परंतु त्याचा विचार ‘मोदी मित्र’ सौदी राजपुत्रांनी केला नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या बदललेल्या धोरणांमुळे मोदी सरकार सध्या अत्यंत विश्वासघातकी शत्रू असलेल्या चिनी ड्रगनच्याही गळ्यात गळा घालत आहे. मात्र हाच ड्रगन पाकिस्तानला सोबत घेऊन भारतासाठी अत्यंत धोकादायक ठरणाऱ्या बांगलादेशच्या ‘प्रोजेक्ट एअरबेस’साठी पुढाकार घेत आहे. हा ‘हँगर’ भारताच्या ‘चिकन नेक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिलीगुडी कॉरिडॉरच्या अगदी जवळ आहे. पंतप्रधान मोदी सध्या ज्या ज्या देशांना ‘मित्र’ म्हणत आहेत, ज्या ज्या राष्ट्रप्रमुखांशी गळ्यात गळे घालून भारताच्या राष्ट्रीय हिताचे संरक्षण केल्याचा आव आणत आहेत, तो प्रत्येक देश भारताशी ‘डबल गेम’ खेळत आहे. रशिया-चीनपासून सौदी-ब्रिटनपर्यंत सर्वच देश एकीकडे मोदींशी ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ करीत आहेत आणि दुसरीकडे भारताच्या राष्ट्रीय हिताचा गळा चिरणारे करार पाकिस्तान, बांगलादेश, तुर्की आदी देशांसोबत करीत आहेत. भारतासोबत जग ‘बनवाबनवी’चा खेळ खेळत आहे आणि मोदी सरकार देशाच्या स्वाभिमानाचा खेळखंडोबा करीत आहे!