
विज्ञानधारा
दिवाळीचा सण हा आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. या सणाच्या निमित्ताने प्रकाशित होणारे दिवाळी अंक म्हणजे खमंग फराळासोबतचे वैचारिक खाद्यच असते. सध्याच्या घडीला ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा परवलीचा शब्द झालेला आहे. याच विषयावर ‘विज्ञानधारा’ हा अंक बेतलेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी विचारशक्ती यावर येत्या काही काळात ऊहापोह सुरू होणार असल्याने हा अंक वाचनीय झालेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्वच क्षेत्रांत अलीकडे क्रांती होताना दिसत आहे. ‘वास्तू अभिकल्प आणि कृत्रिम बुद्धिमत्ता’ या लेखाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर करण्यात येत आहे, यावर सुलक्षणा महाजन यांचा लेख वाचनीय आहे. अनघा शिराळकर यांनी लिहिलेल्या ‘हवामान शास्त्राच्या विकासात कृत्रिम बुद्धिमत्तेचा सहभाग’ हा लेख वाचताना अनेक नव्या गोष्टी आपल्याला उमगतात. अतिशय सखोलपणे हा लेख मांडण्यात आलेला असल्यामुळे एका अनोख्या विश्वात आपल्याला डोकावता येते. संगीता गोडबोले, नरेंद्र गोळे, आनंद घैसास, आनंद घारे, बिपीन भालचंद्र देशमाने, शरद काळे, कुसुमसुत, हेमंत लागवणकर यांचे वैविध्यपूर्ण लेखही आपल्याला नवे खाद्य पुरवतात. याच जोडीला डॉ. किशोर कुलकर्णी, डॉ. मंजुश्री कुलकर्णी, डॉ. जयंत वसंत जोशी, डॉ. रंजन गर्गे, डॉ. वसुधा जोशी यांनीही ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर यथोचित लिहिलेले लेख वाचनीय झाले आहेत.
संपादक : शरद काळे, कार्यकारी संपादक : अरुण जोशी
पृष्ठे : 113, मूल्य : 200 रुपये
दर्यावर्दी
दिवाळी अंकाच्या इतिहासात ‘दर्यावर्दी’ हे नाव आजही मानाने घेतले जाते. 83 व्या वर्षात यंदा या अंकाने पदार्पण करत पुन्हा एकदा वाचकांसाठी मेजवानी आणली आहे. वैविध्यपूर्ण लेखांनी सजलेला हा अंक सागरी जीवनावरील एनसायक्लोपीडिया म्हटल्यास वावगे ठरू नये. सागरामध्ये खूप सारी संपत्ती दडलेली आहे. सध्या लाटांपासून वीजनिर्मिती करण्याचाही घाट घातला जात आहे. यंदाच्या या दिवाळी अंकाचे वैशिष्टय़ म्हणजे पीएचडीधारक लेखकांनी या अंकात लेख लिहिले आहेत. यामध्ये डॉ. नंदिनी देशमुख, डॉ. अभय हुले, डॉ. राजम यांसारख्या विविध प्राध्यापकांच्या लिखाणाने या अंकाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. अंकातील विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेख ही या अंकाची जमेची बाजू आहे. ‘दर्यावर्दी’ने कायमच सागरासंदर्भातील विषयांवर वैविध्यपूर्ण अंकांचा नजराणा वाचकांना दिलेला आहे. यंदाही वैविध्यपूर्ण विषयांनी सजलेला हा अंक वाचण्याजोगा आहे यात शंका नाही.
संपादक : अमोल सरतांडेल, पृष्ठे : 147, मूल्य : 150 रुपये
सृजनसंवाद
‘सृजनसंवाद’ दिवाळी अंकाचे पाचवे वर्ष असून यंदा ‘स्वप्न’ हा विषय घेण्यात आला आहे. स्वप्नांच्या मानसशास्त्राrय उगमस्थानाचा शोध प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ नंदू मुलमुले यांनी ‘स्वप्नामध्ये रचिल्या ओळी’ या लेखातून घेतला आहे. ‘मनोरथा चल त्या नगरीला’ या लेखातून ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके यांनी यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकला आहे. काही ध्येयवेडय़ा माणसांच्या स्वप्नाबाबत ज्येष्ठ लेखक दिनकर गांगल यांनी ‘स्वप्नातले जगणे’ या लेखातून लिहिले आहे. लेखिका रश्मी वारंग यांनी ‘स्वप्नांच्या गावा जावे’ या लेखातून शून्यातून उभ्या राहिलेल्या ब्रँड्सच्या स्वप्नपूर्तीचा वेध घेतला आहे. मानसोपचार तज्ञ मानसी आमडेकर यांनी पाल्यांच्या व एकूणच भंगलेल्या स्वप्नांविषयी व वाढत्या अपेक्षांविषयी अनुभव व्यक्त केले आहेत. चित्रपट समीक्षक आशीष निनगुरकर यांनी सयाजी शिंदे यांचा अभिनेता होण्याचा स्वप्नप्रवास व्यक्तिचित्रणातून रेखाटला आहे. नामवंत व नव्या कवींच्या कविता हे या दिवाळी अंकाचे आकर्षण आहे. त्याप्रमाणे अनेक वाचकीय लेख,कथा, व्यक्तीविशेष ही अंकाची जमेची बाजू आहे.
संपादक : गीतेश गजानन शिंदे, पृष्ठे : 176, मूल्य : 350 रुपये
कला मंच
या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ लक्षवेधी असून सानिका काशीकर हिचा सुंदर पह्टो या मुखपृष्ठावर आहे. अंतरंग विभागात ‘अशीच एक कमळी’, ‘आनंदाचे सरोवर – एक सखोल चिंतन’, ‘वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी’, रामदास खरे यांचे ‘एक प्रतिभासंपन्न नक्षत्राचा दस्तावेज’ घनश्याम बडेकर यांचा ‘दहशतवादी जेव्हा जिवंत पकडला जातो’ आदी लेख माहितीपूर्ण आणि वैचारिक आहेत, तर कविता विभागातील आरतीप्रभू, हेमांगी नेरकर, जयश्री हरी जोशी, प्रतिभा सराफ, रामदास खरे, ज्योती कपिले आदी विविध कवींच्या कविता वाचायला मिळतील. या अंकातील बाल विभागही लक्षवेधक आहे. यामध्ये एकनाथ आव्हाड यांचा ‘आनंदाचे इंद्रधनुष्य’, प्रतिभा सराफ यांचा ‘समजूतदार आरव’, मीनल यशराज झांटये-नेरकर यांचा ‘बाललैंगिक अत्याचार व कायदा’, आदी लेख ज्ञानात भर घालणारे आहेत.
संपादिका : हेमांगी अरविंद नेरकर
पृष्ठे : 176, मूल्य : 125 रुपये
मनातली जाणीव
विविध लेख आणि कथा असणारा मनातील जाणीव हा दिवाळी अंक. यंदा या अंकाचे 11 वे वर्ष आहे. काही दिवाळी अंक हे कोणताही विषय वा निमित्त याचा आधार न घेता वाचकांना केवळ साहित्यिक फराळ देता यावा या उद्देशाने काढले जातात. हा त्यापैकीच एक अंक. यात सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते काशीनाथ घाणेकर यांचा जीवनपट व चित्रपट प्रवास मांडणारा शरद कोरडे यांचा लेख उल्लेखनीय आहे. तसेच प्रदीप देसाई यांचा सचिन देव बर्मन यांच्यावर आधारित लेखही वाचनीय आहे. हेमांगी नेरकर, मेघना साने, काशीनाथ माटल, नागेश शेवाळकर आणि अशा काही लेखकांच्या कथा, कविता यांनी अंक सजला आहे.
संपादिका : सोनल खानोलकर, पृष्ठे : 96, मूल्य : 100 रुपये.
मोहिनीराज
‘मोहिनीराज’ मासिक दिवाळी अंकाचे हे 37 वे वर्ष आहे. कथा, कविता, लेख यासोबत पाककृती हा विशेष विभाग या दिवाळी अंकात आहे. अंकातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कथा स्पर्धेतील निवडक कथांनी अंक वाचनीय ठरला आहे. भारती देशपांडे, शची पाटणकर, बाबुराव पाटील, आदी विजेत्यांच्या कथा अंकात आहेत. पाककृती विभाग अलका फडणीस आणि लतिका देशमुख यांनी सजविला आहे. लेखन, मराठी भाषा आणि ग्रंथजीवन अशा विषयांवर आधारित लेख आहेत. अलका फडणीस यांचा पाककृती विभाग वाचकांना आवडणारा असा आहे.
संपादक : सुभाष झेंडे, पृष्ठे : 60, मूल्य : 130 रुपये

























































