निवडणूक आयोग मतदार याद्या दुरुस्त का करत नाही? जाब विचारण्यासाठी 1 नोव्हेंबरला मोर्चा – हर्षवर्धन सपकाळ

मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत हे काँग्रेस पक्षाने पुराव्यासह दाखवून दिले आहे. पण निवडणूक आयोग त्याची गंभीरपणे दखल घेत नाही. झोपलेल्या या निवडणूक आयोगाला जागे करण्यासाठी सर्व पक्षांनी 1 नोव्हेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चात काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात बुलढाणा येथे पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुंबईत आज 1 नोव्हेंबरच्या मोर्चाचा अनुषंगाने बैठक आयोजित केलेली होती पण काही वैयक्तीक व घरगुती कामामुळे मी या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही पण काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. 1 तारखेच्या मोर्चातही काँग्रेस पक्षाचा सहभाग असणार आहे. या बैठकीला वा मोर्चात कोण सहभागी होणार हे गौण असून मुद्दा महत्वाचा आहे असेही सपकाळ म्हणाले.

बच्चु कडू यांच्या आंदोलनावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सरकार कधी पोलिसांना तर कधी कोर्टाला पुढे करून मुख्य मुद्द्यापासून पळ काढत आहे. कोर्टाला पुढे करून सरकार शेतकऱ्यांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर पुढे येऊन चर्चा केली पाहिजे. निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले व आता कर्जमाफी करण्यास वेळकाढूपणा का केला जात आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असेल तर हा त्यांचा नाकर्तेपणा आहे, त्यांची पत असेल तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत जावून महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज आणावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.