
मतचोरीविरोधात जनजागृतीची लाट आली आहे. शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी केलेल्या मतदार यादीतील घोटाळय़ाच्या प्रेझेंटशननंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात मतचोरीचा लाइव्ह डेमो देण्यात आला. व्हीव्हीपॅटच्या काळय़ा काचेआडून कसा खेळ होतो आणि चोरी कशी होऊ शकते, हे तज्ञांनी स्वतः मतदान करून दाखवून दिले.
दिल्ली आयआयटीचे पदवीधर राहुल मेहता यांनी बनवलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या मदतीने ईव्हीएम हटाव सेनेचे अमित उपाध्याय व यक्षित पटेल यांनी हे प्रात्यक्षिक दाखवले. मतचोरीसाठी मशीन हॅक करण्याची गरज नसून मशीनमध्ये विशिष्ट प्रोग्रॅम टाकून चोरी होऊ शकते हे उपाध्याय यांनी दोन पद्धतीने समजावून सांगितले.
लाइट सेन्सर
निवडणूक आयोगाच्या मशीनमध्ये लाइट सेन्सर असतो. मात्र अनेकदा मतदान केल्यानंतर मतदार स्लिप बघण्यासाठी जास्त वेळ थांबत नाहीत. अशा वेळी जर संबंधित मशीनमध्ये चोरीचा प्रोग्रॅम टाकलेला असेल तर सहज चोरी होऊ शकते. अशी मशीन स्लिप लवकर जनरेट करत नाही. मतदार चार सेकंदाच्या आत तिथून निघून गेला की लाइट सेन्सरच्या माध्यमातून ते मशीनला कळते आणि त्यानंतर मशीनला फीड केल्यानुसार हवी ती स्लिप जनरेट होते.
2017 मध्ये आली काळी काच
सध्याच्या पद्धतीनुसार ईव्हीएमवर मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील लाइट पेटते आणि मतदाराला स्लिप दिसते. मात्र ही लाइट फक्त 8 सेकंद दिसते. लाइट गेल्यानंतर मतदाराला ती स्लिप दिसत नाही. त्यामुळे ती खाली पडली आहे की नाही हे कळत नाही. इथेच खरी मेख आहे. मशीनमध्ये चोरीचा प्रोग्रॅम टाकलेला असेल तर ही स्लिप अडकवून ठेवली जाते. दुसऱया मतदाराने त्याच चिन्हावर मतदान केले तर पुन्हा लाइट पेटून ती स्लिप दिसते. लाइट बंद झाल्यावर दुसऱया चिन्हाची स्लिप जनरेट होते आणि खाली पडते. म्हणजे दोन मतदारांनी एकाच उमेदवाराला मतदान केले तरी स्लिप एकच जनरेट होते आणि व्हीव्हीपॅटची लाइट गेल्यानंतर भलत्याच चिन्हाची स्लिप जनरेट होते. त्यामुळे मतदान आणि स्लिपची संख्या जुळते आणि चोरी झाल्याचे कळत नाही, मात्र प्रत्यक्षात चोरी झालेली असते. तज्ञांच्या म्हणण्यांनुसार, 2017 मध्ये व्हीव्हीपॅटला काळी काच लावली गेली. त्याआधी ती काच नव्हती. यापूर्वी मतदानानंतर 15 सेकंदांपर्यंत लाइट पेटायची, ती वेळ नंतर 8 सेकंद करण्यात आली.
गडकिल्ल्यांवर नमो टूरिझम सेंटर्स दिसल्यास फोडून टाकू : राज ठाकरे
नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त शिवनेरी, रायगड आणि राजगडावर नमो टुरिझम सेंटर्स सुरू करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातला आहे. त्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कडाडून विरोध दर्शवला. ‘गडकिल्ल्यांवर फक्त आमच्या महाराजांचेच नाव पाहिजे. आमची सत्ता असो किंवा नसो, किल्ल्यावर काय, आजूबाजूला कुठेही ही सेंटर्स उभारू देणार नाही. उभी केली की फोडून टाकणार,’ असा इशारा त्यांनी दिला.
 
             
		



































 
     
    



















