
बाईक अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे उत्पन्न भविष्यात किती असेल या आधारावर नुकसानभरपाई देण्यात यावी, असे आदेश देत उच्च न्यायालयाने एका पीडिताच्या कुटुंबाला नुकसानभरपाईची रक्कम वाढवून दिली.
भविष्यातील उत्पन्नाचा अंदाज बांधून नुकसानभरपाई देता येत नाही, असा दावा राज्य परिवहन महामंडळाने केला होता. हा दावा अमान्य करत अपघात दावा प्राधिकरणाने या कुटुंबाला 54 लाखांची भरपाई मंजूर केली. न्या. अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठाने या रकमेत 21 लाखांची वाढ केली. मृताच्या भविष्यातील उत्पन्नावर कुटुंबाला नुकसानभरपाई मिळायला हवी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण
गणेश वाघ या 24 वर्षीय तरुणाचा 2015मध्ये बाईक अपघात झाला. एसटीने त्याला धडक दिली. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबाने नुकसानभरपाईसाठी अर्ज केला. अपघात दावा प्राधिकरणाने हा अर्ज मंजूर केला. याविरोधात महामंडळाने अपील याचिका केली. नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ करून मिळावी यासाठी कुटुंबाने स्वतंत्र याचिका केली. या दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली.
मित्राच्या उत्पन्नाचा आधार
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असताना वाघचा अपघाती मृत्यू झाला. अपघात दावा प्राधिकरणासमोर कुटुंबाने वाघच्या मित्राचा उत्पन्नाचा तपशील सादर केला. हा मित्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाला. त्याचे उत्पन्न दरमहा 54 हजार आहे. त्यानुसार वाघचे भविष्यातील अपेक्षित उत्पन्न व खर्च याची बेरीज करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कुटुंबाने केली होती.
न्यायालयाचे निरीक्षण
प्राधिकरणाने वाघचे दरमहा उत्पन्न 35 हजार रुपये असेल असे ग्राह्य धरून नुकसानभरपाई दिली. मात्र तसे न करता वाघचे उत्पन्न दरमहा 50 हजार रुपये अपेक्षित होते, असा अंदाज करत नुकसानभरपाईची रक्कम मिळायला हवी, असे निरीक्षण न्या. कडेठाणकर यांनी नोंदवले.
 
             
		





































 
     
    





















