
पूर्व मुक्त मार्गाच्या विस्तारीकरणासाठी फडणवीस सरकारने पूर्व द्रुतगती महामार्गावरील शेकडो झाडांवर कुऱ्हाड उगारली आहे. सरकारच्या या निर्णयाला सर्वच स्तरांतून कडाडून विरोध केला जात आहे. महामार्गालगत झाडांची लागवड करून कित्येक वर्षे त्यांची देखभाल करणाऱ्या ग्रीन सेज फाऊंडेशनने आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने वृक्षतोड सुरू केल्यास चिपको आंदोलन केले जाणार आहे.
घाटकोपर ते ठाणे प्रवास वेगवान करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. यासाठी विक्रोळी ते ठाणेदरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गावरील 706 झाडे बाधित होणार आहेत. त्यातील 320 झाडे कापली जाणार असून 386 झाडे दुसरीकडे पुनर्रोपित केली जाणार आहे. झाडांची कत्तल आणि पुनर्रोपणाला पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध केला आहे. अॅड. सागर देवरे यांनी एमएमआरडीए आयुक्त आणि मुंबई महापालिका आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. यादरम्यान ग्रीन सेज फाऊंडेशनने चिपको आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्याचा पवित्रा जाहीर केला आहे. झाडांची कत्तल करू नका, विस्तारीत ठाणे ते घाटकोपर पूर्व मुक्त मार्गाचे संरेखन बदला, अशी मागणी ग्रीन सेज फाऊंडेशनने केली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर चिपको आंदोलन करणार असल्याचा इशारा फाऊंडेशनने दिला आहे.
अनेक देशी प्रजातींचे अस्तित्व धोक्यात
ग्रीन सेज फाऊंडेशनने मागील 6 वर्षांत पूर्व द्रुतगती हायवेलगत कदंब, काटेसावर, चिंच, आवळा, साग, अर्जुन, बपुळ, तिवर, पळस, यांसारख्या अनेक देशी प्रजाती झाडांची लागवड केली आहे. ही सर्व झाडे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची असून काही झाडांचे पुनर्रोपण करणार असल्याचे समजते. मात्र पुनर्रोपण यशस्वी होण्याचा दर नगण्य आहे. त्यामुळे अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आम्ही आतापर्यंत 700 हून अधिक देशी झाडांची लागवड केली आहे. नित्यनियमाने पाणी देऊन झाडे वाढवली. मुलांप्रमाणे झाडांना जिवापाड जपले आहे. हीच झाडे खोटय़ा विकासाच्या नावाखाली कापण्याचा सरकारचा डाव आहे. सरकारला पर्यावरणपूरक विकास का करता येत नाही? झाडांचे पुनर्रोपण करायचे असेल तर ते आमच्या संस्थेमार्फतच करावे.
— जितेंद्र राठोड, संस्थापक–अध्यक्ष, ग्रीन सेज फाऊंडेशन
 
             
		





































 
     
    





















