
सांगली महापालिकेच्या निवडणुकीचे वातावरण तापत असताना भाजपअंतर्गत खदखद व्यक्त होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकमंत्र्यांच्या एककलमी पक्षप्रवेशामुळे भाजप निष्ठावंतांमध्ये प्रचंड नाराजी उफाळून येत आहे. महापालिका क्षेत्रात सहा माजी नगरसेवकांनी प्रवेश केला असताना 22 तिकिटे कोणाला? असा सवाल खुद्द सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करीत, भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपअंतर्गत खदखद चव्हाटय़ावर आली आहे.
आगामी सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पक्षात नव्याने येणाऱयांना प्रवेश देऊन थेट तिकीट देण्यात येणार असल्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. याबाबत आमदार सुधीर गाडगीळ यांनी पत्रकाद्वारे उघडपणे नाराजी व्यक्त केली.
‘भाजपसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱया कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा निर्धार आम्ही केला असून, कोणत्याही कार्यकर्त्याला वाऱयावर सोडले जाणार नाही,’ असे सांगून आमदार गाडगीळ म्हणाले, ‘पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहे. पण यामुळे निष्ठावंत व दिवस-रात्र राबणाऱया जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. काहीजण पालकमंत्र्यांची दिशाभूल करून आपल्याला हवे तसे वक्तव्य करून घेत आहेत. नुकतेच पालकमंत्र्यांनी 22 तिकिटे देणार असल्याचे सांगितले. मात्र, महापालिका क्षेत्रात नव्याने केवळ सहा नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे; मग 22 तिकिटे कोणाला देणार?’ असा प्रश्न आमदार गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.
केवळ यापूर्वी ते निवडून आले म्हणून उमेदवारी देणे योग्य नाही. त्या-त्या प्रभागातील कार्यकर्त्यांची मते, जनतेचा विचार करूनच उमेदवारीचे वाटप होईल. कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ. गत महापौर निवडणुकीत काही नगरसेवक फुटल्यामुळे पक्षाला तोटा झाला होता. मात्र, त्यांनी आपली चूक मान्य करून विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम केल्याचे सांगून आमदार गाडगीळ म्हणाले, विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात कोणी-कोणी काम केले आहे, त्याचा लेखाजोखा वरिष्ठांकडे सादर करणार आहे.’
‘काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱयावर सोडणार नाही. मी तीन वेळा सांगली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी प्रामाणिक काम केलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, यासाठी मी कटिबद्ध आहे,’ असे आमदार गाडगीळ यांनी ठामपणे सांगितले. आमदार गाडगीळ यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे पालकमंत्र्यांविषयी भाजप कार्यकर्त्यांत असलेली नाराजी स्पष्ट झाली आहे.
 
             
		





































 
     
    






















