
पालघर जिल्ह्यातील आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व निवडणुकांमध्ये भगव्याचाच आवाज घुमेल, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मेळाव्यांमध्ये शिवसैनिकांनी केला. पालघर जिल्हा संपर्क कार्यालय, बाडापोखरण, निकणे, डहाणू, वडवली याठिकाणी झालेल्या मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गावात संघटनशक्ती अधिक बळकट करण्याचा संकल्पही यावेळी सर्वांनी केला. पालघर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार विलास पोतनीस आणि पालघर लोकसभा यंत्रणाप्रमुख, उपनेते अमोल कीर्तिकर यांनी मंगळवार, बुधवार सलग दोन दिवस पालघर व डहाणू विधानसभा मतदारसंघात झंझावती दौरा केला. यावेळी शिवसैनिकांचा जोश आणि उत्साह वाखाणण्याजोगा होता.
शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना विलास पोतनीस यांनी पालघर जिल्ह्यात शिवसेना मजबूत असल्याचा विश्वास व्यक्त केला. प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता हेच पक्षाचे खरे बळ आहे. विकासात्मक कामांवर भर देऊन जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर अमोल कीर्तिकर यांनी प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या गावात, विभागात जनतेच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी आघाडीवर राहावे असे आवाहन केले. शिवसेना जनतेच्या हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. तळागाळातील कार्यकर्ता हीच पक्षाची ताकद असल्याचेही त्यांनी सांगितले.
मेळाव्याला सहसंपर्कप्रमुख विकास मोरे,पालघर जिल्हाप्रमुख गिरीश राऊत, अनुप पाटील, लोकसभा निरीक्षक अजय ठाकूर, उपजिल्हाप्रमुख तानाजी काकडे, विधानसभा संघटक जयेंद्र दुबळा, विश्वास वळवी, तालुकाप्रमुख प्रवीण करमोडा, संजय पाटील, प्रदीप लिमये, उपतालुकाप्रमुख रमेश गवळी, उज्ज्वला डामसे, विश्वास निकम, सरपंच सुनील भोईर, शैलेश कोरडा, रोहित बोरकर, अनिल ठाकरे, राजू दळवी, सोमन गुरुजी, मगन घोषे, संदीप चिपात, कल्पेश कोंब आदी उपस्थित होते. गावागावात चैतन्य सातपाटी, माहीम, दांडी, तारापूर, धाकटी डहाणू, चिंचणी, चारोटी, दाभोण, भिसेनगर, केळवा, उमरोळी, साल वड परिसरातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यांमुळे गावागावात शिवसैनिकांमध्ये चैतन्य होते.
 
             
		





































 
     
    






















