बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जयसिंगपूर पोलिसांची कारवाई

शंभर रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या बाजारात खपवण्याच्या तयारीत असलेल्या तिघांच्या टोळीचा जयसिंगपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून शंभर रुपयांच्या 68 हजार 400 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

साहील रफिक मुलाणी (वय 26, रा. उदगाव, ता. शिरोळ), ओंकार बाबुराव तोवार (रा. इचलकरंजी, सध्या रा. दानोळी, ता. शिरोळ), रमेश संतराम पाटील (वय 29, रा. बरगेमळा, जुना चंदूर रोड, इचलकरंजी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साहिल मुलाणी हा उदगाव शेजारील चिंचवाड येथे जनावरांच्या गोठय़ात व इचलकरंजी येथील बसवेश्वरनगर येथे शंभर रुपयांच्या बनावट नोटा बनवत होता. त्याच्यासोबत ओंकार तोवार आणि रमेश पाटील त्याला सहकार्य करत होते. या नोटा बाजारात खपवण्याच्या दृष्टीने हे तिघे कार्यरत असल्याची माहिती जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांना मिळताच, पोलिसांनी या तिघांच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी या टोळीकडून शंभर रुपयांच्या 68 हजार 400 रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि प्रिंटर, कटर, मोबाईल असा 19 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीत अजून कोणी सहभागी आहे का, याविषयी जयसिंगपूर पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, प्राथमिक तपासात आरोपींनी बनावट चलन तयार करून बाजारात खपविण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे.