
शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटनच्या राजघराण्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. ब्रिटनच्या राजघराण्यातील वाद चव्हाट्यावर आला असून किंग चार्ल्स तृतीय यांनी धाकटे बंधू प्रिन्स अँड्र्यू यांना घराबाहेर काढले आहे. प्रिन्स अँड्र्यू यांना देण्यात आलेल्या सर्व रॉयल पदव्या काढून घेत त्यांची राजघराण्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर ब्रिटनच्या बकिंगहॅम पॅलेसमधूनही त्यांना बाहेर काढले आहे. याबाबत बकिंगहॅम पॅलेसने एक निवेदनही जारी केले आहे.
ब्रिटनचे किंग चार्ल्स तृतीय यांनी त्यांचे बंधू प्रिन्स अँड्र्यू यांच्या उर्वरित सर्व पदव्या काढण्यात घेण्यात येत असून त्यांना राजघराण्यातून बेदखल करण्यात येत आहे. याबाबतची औपचारिकताही किंग चार्ल्स तृतीय यांनी पूर्ण केल्याचे बकिंगहॅम पॅलेसने आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
प्रिन्स अँड्र्यू यांच्या सर्व पदव्या, उपाध्या आणि सन्मान काढून घेण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली असून ते आता फक्त अॅड्र्यू माउंटबेटन विंडसर या नावाने ओळखले जातील. याचाच अर्थ ते राजकुमार राहिले नाहीत. तसेच ते आता त्यांच्या पर्यायी खासगी निवासस्थानात जातील आणि त्यांना त्या ठिकाणी कायदेशीस संरक्षण दिले जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
अँड्र्यू यांच्या पदव्या, सन्मान काढून घेण्यात आल्या असल्या तरी त्यांच्या मुली राजकुमारी युजिनी आणि राजकुमारी बिट्राईस यांच्या शाही पदव्या कायम राहणार आहेत. कारण त्या एका सम्राटाच्या मुली आहेत. दरम्यान, अँड्र्यू यांच्यासोबत त्यांची माजी पत्नी सारा फर्ग्यूसन यांनाही पॅलेस बाहेर काढण्यात आले आहे. अर्थात 1996 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. मात्र त्या पूर्वाश्रमीच्या पतीसोबत त्याच निवासस्थानात राहत होत्या, असे वृत्त बीबीसीने दिले आहे.
VIDEO | King Charles III’s younger brother, Prince Andrew, is set to lose his title of “Prince” and will move out of the Royal Lodge on the Windsor Castle estate, according to a Buckingham Palace statement.
The move follows Andrew’s recent decision to relinquish the title of… pic.twitter.com/76wOyESH0i
— Press Trust of India (@PTI_News) October 31, 2025
नेमकं प्रकरण काय?
लैंगिक अत्याचार आणि लहान मुलांच्या शोषण प्रकरणात दोषी ठरवलेल्या दिवंगत जेफ्री एप्स्टीनसोबतच्या संबंधांमुळे प्रिन्स अँड्र्यू वादात अडकलेले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी एप्स्टीनसोबतचे संबंध आणि पीडितांपैकी एक व्हर्जिनिया रॉबर्ट्स गिफ्रे हिने पुस्तकातून केलेल्या आरोपांमुळे अँड्र्यू यांनी ड्यूक ऑफ यॉर्क हा किताब सोडला होता. त्यानंतर त्यांच्यावर राजघराण्यातून दबाव वाढला होता. 17 वर्षांची अल्पवयीन असताना प्रिन्स अँड्र्यू यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी एप्स्टीन हिने आपली तीन वेळा मानव तस्करी केली होती, असा आरोप व्हर्जिनिया हिने आत्मकथेतून केला होता.
 
             
		





































 
     
    




















