…तर विनाशकारी परिणामांना सामोरे जावे लागेल; अफगाणिस्तानची पाकड्यांना धमकी

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संबंध सध्या ताणले गेले आहेत. दोन्ही देशातील संघर्षामुळे सीमारेषा बद असल्याने पाकिस्तानात महागाई गगनला भिडली आहे. त्यामुळे सीमारेषेजवळील आदिवासी नेत्यांचे मन वळवण्यासाठी लष्कारप्रमुख आसीम मुनीर यांनी सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी अफगान-तालिबानसह हिंदुस्थानवर आरोप केले. त्याला अफगाणिस्तानने सडतोड प्रत्युत्तर दिले असून पाकिस्तानकडून कुरापती सुरुच राहिल्या तर विनाशकारी परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही पाकिस्तानला देण्यात आला आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी खैबर पख्तूनख्वा येथे महासभा बोलावत आदिवासी नेत्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच हिंदुस्थानचा उल्लेख करून त्यांनी अफगाण तालिबानवर आरोप केले. त्यावर अफगाणिस्तानने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, जर त्यांच्या संयमाची परीक्षा घेतली गेली तर त्याचे परिणाम विनाशकारी होतील.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख, फील्ड मार्शल असीम मुनीर, परदेश दौऱ्यावरून परतले आणि त्यांनी पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे महासभा बोलावली. ही महासभा म्हणजे आदिवासी वरिष्ठांचा मेळावा. यात इस्लामिक धर्मगुरू आणि ज्येष्ठ मुस्लिम एकत्र आले. यावेळी असीम मुनीर यांनी पाकिस्तानी धर्माचा उल्लेख केला, अफगाणिस्तानचे आरोप फेटाळले आणि पुन्हा एकदा पाकिस्तानमधील हल्ल्यांसाठी कथित हिंदुस्थानी समर्थित घटकांना जबाबदार धरले. पाकिस्तानने काबूलशी संबंध सुधारण्यासाठी वारंवार प्रयत्न केले तरीही, अफगाणिस्तानची भूमी “फितना अल-खवारीज” आणि “फितना अल-हिंदुस्तान” दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे, असे ते म्हणाले.

पाकिस्तानचे आव्हान स्वीकारत, अफगाणिस्तानचे गृहमंत्री आणि तालिबान नेते खलिफा सिराजुद्दीन हक्कानी म्हणाले, “आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, अन्यथा त्याचे परिणाम विनाशकारी होतील. खलिफा सिराजुद्दीन यांनी स्पष्टपणे सांगितले की अफगाणिस्तानकडे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे किंवा मोठी शस्त्रे नसली तरी, हल्ला झाल्यास आम्ही सडतोड प्रत्युत्तर देऊ. आपल्या भूभागाचे रक्षण करणे हे आपल्या प्राधान्यांपैकी एक आहे. हे सर्व असूनही, परस्पर समंजसपणाचा मार्ग खुला आहे. परंतु जर कोणी हल्ला केला तर आपण जगातील राजांशी लढलो आहोत आणि आपल्या भूभागाचे रक्षण करणे आपल्यासाठी कठीण काम नाही.

खलिफा सिराजुद्दीन हक्कानी म्हणाले की कतार आणि तुर्कीमध्ये पाकिस्तानसोबतच्या अलिकडच्या बैठकांमध्ये पाकिस्तानला स्पष्टपणे सांगण्यात आले होते की त्याच्या अंतर्गत समस्या अफगाणिस्तानशी जोडल्या जाऊ नयेत. समस्या तुमची आहे. तुमच्याकडे उपाय आहे. मग तुम्ही त्या समस्या आमच्याशी का जोडत आहात? अफगाण लोकांनी युद्धभूमीवर स्वतःला सिद्ध केले आहे आणि जर आपल्या संयमाची पुन्हा परीक्षा घेतली तर त्याचे परिणाम विनाशकारी असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.