अभियंत्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा काम बंद! इंजिनीअर संघटनेचा इशारा

सांताक्रूझ (पूर्व) येथील कलिना परिसरात गुरुवारी दुपारी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची पाहणी करताना पालिकेच्या अभियंत्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकारामुळे अभियंता संघटनेने तीव्र संताप व्यक्त होत आहे. अभियंत्याला मारहाण करणाऱयांवर 24 तासांत कारवाई करा, अन्यथा अभियंते ‘काम बंद’ आंदोलन करतील, असा इशारा अभियंता संघटनेने दिला आहे.

सहाय्यक अभियंता (रस्ते विभाग) सचिन बंडगर हे आपल्या सहकाऱयांसह कलिना येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची पाहणी करत होते. त्याचवेळी स्थानिक समाजपंटक राजा अकबर कुरेशी याने बंडगर यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात कलम 132 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, घटनेनंतर 24 तास उलटूनही पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केलेली नाही. या निष्क्रियतेविरोधात आम्ही कामे करायची कशी? असा संतप्त सवाल म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भुतेकर यांनी उपस्थित करीत कारवाईची मागणी केली आहे. अभियंत्यांना संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.