दिल्ली डायरी – तेजस्वीच्या ‘चेहऱ्या’ने निवडणूक फिरेल काय?

>> नीलेश कुलकर्णी

देर आये दुरुस्त आये म्हणत उशिरा का होईना, इंडिया आघाडीतर्फे लालूपुत्र तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले. या निर्णयामुळे सुरुवातीला अगदीच एकतर्फी वाटणारी बिहारची निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता आहे. नितीश कुमार की तेजस्वी यादव, असा प्रश्न बिहारी जनतेच्या मनात आहे, पण ‘दोघात तिसरा; बाकी सगळं विसरा’ अशीच स्थिती निवडणुकीनंतर उद्भवण्याची शक्यता आहे.

बिहार विधानसभा निवडणूक एनडीएतर्फे नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली लढवली जात असली तरी नितीशबाबूंच्या पायाखालचे जाजम ओढून आपलाच मुख्यमंत्री बसविण्याचा भाजपचा खटाटोप लपून राहिलेला नाही. तिकडे या निवडणुकीत आधी काँग्रेस धाकटय़ा भावाची भूमिका घ्यायला तयार नव्हती. बिहारमध्ये काँग्रेसची ताकद मर्यादित आहे. मात्र तरीही जागावाटपासाठी मोठी ताणाताणी झाली. सुरुवातीला निवडणुकीची सूत्रे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव या युवा जोडीकडे होती. मात्र दोघांनाही मतभेद मिटवता आले नाहीत. त्यातच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नेमके आजारी पडले. त्यामुळे अखेरीस सोनिया गांधींनी सूत्रे हाती घेतली. थेट लालूप्रसाद यादवांना फोन केला. त्यातून काही गैरसमज गळून पडले. बिहारमध्ये काँग्रेसच्या प्रभारीपदाची धुरा सांभाळणारे कृष्णा अल्लावरू यांना तत्काळ बिहारमधून बोलावून घेण्याची लालूंची मागणी सोनियांनी नुसती मान्यच केली नाही, तर युवक काँगेसच्या प्रभारीपदावरूनही त्यांची गच्छंती केली. त्यामुळे लालूंचा ‘इगो’ सांभाळला गेला. बिहारमध्ये काँगेस व राष्ट्रीय जनता दलाची आघाडी तुटता तुटता वाचली. काँगेसकडून तेजस्वी यादवांच्या सीएम फेससाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळत नसल्याने लालू परिवार आक्रमक झाला होता. त्याच वेळी राहुल गांधी हेदेखील राजदला फारसा भाव देण्याच्या मनःस्थितीत नव्हते. गांधी परिवाराचा अपक्ष खासदार पप्पू यादवांवरचा विश्वास हेही लालूंच्या क्रोधाचे एक कारण होते. कृष्णा अल्लावरू यांच्यावर काँगेसची तिकिटे विकल्याचे गंभीर आरोप झाले. त्यानंतर त्यांची गच्छंती झाली. त्यासाठी सोनियांनी त्यांचे विश्वासू अशोक गेहलोत यांची निवड करून संकटमोचक म्हणून त्यांची पाटण्याला रवानगी केली. गेहलोतांनी नेहमीप्रमाणे मोहीम फत्ते केली. तेजस्वी यादवांच्या चेहऱयावर एकीकडे इंडिया आघाडी निवडणूक लढविली जात असताना एनडीएमध्ये नितीश कुमारांचा ‘एकनाथ शिंदे’ करण्याच्या हालचाली सुरू असल्याने अस्वस्थता आहे. मित्रपक्षांचाच ‘गेम’ करण्याच्या दोन्ही आघाडय़ांमधील अहमहमिकेमुळे बिहारची निवडणूक आता चुरशीची ठरेल. दलित तसेच मुस्लिम हे फॅक्टर महत्त्वाचे ठरणारच आहेत. शिवाय प्रशांत किशोर स्वतः निवडणूक लढविणार नसले तरी त्यांचा पक्ष कोणाची मते खेचतो, यावरही बरेच काही अवलंबून आहे. तेजस्वींचे बंधू तेजप्रताप लालू परिवाराविरोधात मैदानात उतरले आहेत. लालूंच्या उर्वरित परिवारातही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. त्यातच लालूंच्या ‘जंगलराज’च्या आठवणी जाग्या केल्या जात आहेत. ‘जंगलराज -2’ चे नरेटिव्ह रचले जात आहे. त्यामुळे फक्त मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केल्यामुळे तेजस्वी यांच्यापुढचे प्रश्न सुटणार नाहीत. ‘तेजस्वी’ प्रवास करून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केलेले तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचा सोपान चढतात का ते दिसलेच.

ओमर अब्दुल्लांविरोधात बंडाळी

2019 मध्ये जम्मू-कश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत सत्तारूढ नॅशनल का@न्फरन्सचे तीन तर भाजपचा एका जागेवर विजय झाला. नॅशनल काॅन्फरन्ससाठी हे यश मोठेच. मात्र या निवडणुकीत मोठी हेराफेरी झाल्याचे आरोप झाले. या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांची सत्तेवरची पकड मजबूत झाल्याचे मानले जात असतानाच आता नॅशनल काॅन्फरन्सच्या दोन लोकसभा खासदारांनी सरकारविरोधातच सूर लावल्याने नॅशनल काॅन्फरन्समध्ये ऑल इज नॉट वेल, असा मेसेज गेला आहे. श्रीनगरचे खासदार आगा रहुल्ला मेहंदी व अनंतनागचे खासदार अल्ताफ अहमद यांनी बंडखोरीचे सूर आळवले आहेत. यापैकी अल्ताफ हे पक्षाचे जुनेजाणते नेते असून त्यांचा राज्यभरात प्रभाव आहे. जम्मू-कश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा पुन्हा देण्याची घोषणा ओमर यांनी केली होती. मात्र सत्तेनंतर ते सगळेच विसरून भाजपशी समरस झाल्याचा आरोप पक्षातूनच होतो आहे. ओमर यांनी भाजपशी मिलीभगत केलेली आहे. त्यातूनच भाजपला राज्यसभेची जागा जिंकता आली, असे बोलले जात आहे. या नाराजीतून अल्ताफ यांनी पोटनिवडणुकीत पक्षाचा प्रचार केला नाही. ओमर यांना जम्मू-कश्मीरमधली आपली ‘हुकमत’ कायम ठेवायची आहे, तर भाजपला आपल्या आदेश बरहुपूम काम करणारा मुख्यमंत्री हवा आहे. दोन्ही पक्ष एकमेकांची राजकीय गरज भागवत असल्याने ही ‘अदृश्य युती’ अशीच राहील असे मानले जात आहे. मात्र या सगळ्या मिलीभगतमध्ये नॅशनल काॅन्फरन्स अखंडित राहील काय?