विज्ञान रंजन – रेशीमरेषा!

>> विनायक

हिंदुस्थानी वस्त्रांमध्ये रेशमी वस्त्र  पूर्वापार फार महत्त्वाचे. मुलायम आणि आकर्षक रेशमी साडय़ांवर पूर्वी सोन्या-चांदीच्या जरीची वेलबुट्टी असायची. आताही ‘ऑर्डर’प्रमाणे तशी वस्त्रं मिळतातच. नवजात बाळाच्या ‘कुंची’पासून (मऊ रेशमी इरल्यासारखी) ते रेशमी महावस्त्रापर्यंतच्या चर्चेचे धागेही गुंफले जातात. अर्थात, सुदृढ शरीरावर कोणतंही वस्त्र सुंदरच दिसतं आणि अशा बाह्य आभूषणांपेक्षा अंतर्यामी असलेला सद्भाव अधिक महत्त्वाचा हेही खरंच.

मात्र एक उत्सुकता म्हणून रेशीम काय असतं ते जाणून घ्यायचं तर त्याचे वैज्ञानिक ‘धागे’ कुठंपर्यंत जातात या गोष्टींचा आढावा घ्यायला पाहिजे. विज्ञानात रेशीमधाग्यांना ‘नॅचरल प्रोटीन फायबर’ असे म्हणतात.

‘ऑइस्टर’सारख्या शिंपल्यातील अळय़ांकडे कॅल्शियम कार्बोनेटसारखं कठीण कवच तयार करणारा द्रव निर्माण करण्याची क्षमता असते. तसेच रेशीम किडे रेशीम धागे तयार करतात. थोडक्यात आपण वापरतो त्या अनेक मौल्यवान वस्तू वस्तूतः ‘प्राणीज’ म्हणजे कुणा सजीवाने निर्माण केलेल्या असतात.

रेशमाच्या अळय़ा स्वतःभोवती जो ‘कोष’ विणतात ते मृदू, मुलायम धागे त्यांच्या शरीरातील लाळेपासून स्वतःभोवती एक तंतुमय संरक्षक ‘कोष’ तयार करतात. या किडय़ांना लार्व्हा किंवा पॅटरपिलर म्हटलं जातं. त्यांच्या बाल अळय़ा संरक्षित ठेवण्यासाठी हे कोष असतात. पूर्ण वाढीचे किडे त्यातून बाहेर पडले की, हे कोष पतंगासारख्या (मॉथ) सूक्ष्मजीवांना राहण्यासाठी उपयुक्त ठरतात. रेशीम किडय़ांच्या काही प्रजातींत मादी कीटक नर कीटकाची प्रतीक्षा करीत या कोषात (कपून) राहतात. ‘पतंगां’च्या या संरक्षक मऊशार घरटय़ांचं माणूस रेशीमधाग्यात रूपांतर करून वस्त्रनिर्मिती करतो, ती कशी? (रेशीम शब्द मात्र मूळ फारसी ‘ऑब्रिशम’वरून आलाय. संस्पृतमध्ये त्याला ‘कोष’वरून ‘कौषेय’ म्हणतात.) याचं उत्तर फारसं सुखावह नाही. मल्बेरी किंवा तुतीच्या झाडांची लागवड करून रेशीम किडय़ांचं खाद्य असलेल्या तुतीच्या पानांचा विपुल पुरवठा असलेल्या ठिकाणी रेशमाची पैदास होते.

जास्वंदीसारख्या कातरलेल्या पानांची तुतीची झाडं लाल ‘बेरी’सदृश फळांनी बहरलेली असतात. ती खाद्य असल्याने त्यांचा रस (ज्युस) वापरला जातो. मल्बेरी किंवा तुतीच्या सुमारे 19 प्रमुख प्रजाती आहेत. अशा या तुतीच्या झाडांची उंची 6 फूटांपासून 70 फुटांपर्यंत असते. ही झाडं 30 ते 50 फुटांच्या विस्तारात (घेर) पसरतात.

रेशीम शेती करताना या झाडांवर रेशीम किडे सोडले जातात. तेही तुतीची पानं खाऊन वाढतात आणि ‘पतंगा’त रूपांतर होण्यापूर्वी याच पानांवर कोष विणतात. रेशीम किडे ज्यावर पोसले जातात ती तुतीची ‘अल्बिझिआ ज्युलिब्रिसिन’ प्रकारची झाडं खूप विस्तारलेली असतात.

रेशीम पिंवा सिल्क निर्मितीला ‘सेरिकल्चर’ म्हणतात. रेशमाचे ‘बॉम्बिक्स मोरी’ प्रकारचे रेशीम कीटक तुतीच्या पानांवर वाढवले जातात. त्यांनी योग्य वेळी स्वतःभोवती फुगीर तंतुमय कोष विणला की, रेशीम वस्त्रांसाठी हे कोष गरम पाण्यात टापून त्यातील कोषांकित अळय़ा (प्युपा) नष्ट केल्या जातात. उकळत्या पाण्याने कोषाचे तंतूसुद्धा अधिक मऊ होतात. नंतर त्यातील अळी काढून उरलेल्या कोषतंतूंचे पेलू तयार केले की, कच्चे रेशीम हाती येते.

हवामान दमट आणि समशीतोष्ण असेल तर रेशीम किडे आठवडय़ाभरातच आपल्या लाळेतून स्वतःभोवती कोष विणतात. असे परिपक्व कोष काढून रेशमाचे पेलू बनवण्याचं काम त्यानंतर 3 ते 5 दिवसांत उरकलं जातं. हे सुंदर तंतू बनवताना रेशीम कीटक इंग्लिश 8 च्या आकारात सुमारे 3 लाख वेळा डोकं वळवून एक कोष विणतो.

या ‘सेरिकल्चर’ किंवा रेशीम शेतीची सुरुवात चीनमध्ये झाली ती निओलिथिक म्हणजे नवाश्मयुगापासून. त्यानंतर हिंदुस्थान, जपान, कोरिया, इटली, फ्रान्स, रशिया या ठिकाणीही रेशीम उत्पादन सुरू झाले. सध्या जगातले 60 टक्के रेशीम उत्पादन केवळ चीन आणि हिंदुस्थान याच दोन देशांत होते. 2022 च्या माहितीनुसार जगातले कच्च्या रेशमाचे उत्पादन दरवर्षी 91 हजार मेट्रिक टन, तर त्यातला हिंदुस्थानचा वाटा 38 हजार टनांचा होता.

रेशमी वस्त्रे तशी तुलनेने महाग असतात. रेशीमकोषांची ‘ए’ ते ‘एफ’ अशी वर्गवारी त्याच्या अतूट धाग्यांवर आणि मऊपणावर ठरते. त्यानुसार वेगवेगळय़ा प्रतीचं (ग्रेड) रेशीम तयार होतं. त्यावरून त्याची किंमत ठरते. ती दोन-अडीच हजारांपासून कितीही वर जाऊ शकते. रेशमी साडय़ांवर पूर्वी चांदी-सोन्याच्या जरीची नक्षी असायची. अशा शालू, पैठण्यांची किंमत तशीच भारी असणार. रेशमाचे साधे, बेताच्या किमतीचे कपडेही दिसतात छान यात शंका नाही.