
नवी मुंबई शहरात रक्ताची भीषण टंचाई सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रक्ताच्या शोधासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरोना महामारीपेक्षाही मोठा तुटवडा निर्माण झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून रुग्णांच्या उपचारांत अडचणी निर्माण झाल्या आहेत. पूर्वी नवी मुंबई शहरात वर्षभरात रक्ताच्या सुमारे सहा हजार पिशव्यांचे संकलन होत होते, मात्र आता हेच संकलन साडेतीन हजार पिशव्यांवर आले आहे.
शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांना रक्ताची गरज भासत असते. त्यामुळे रुग्णालयात संबंधित रक्त गटाचे रक्त आगोदरच तयार ठेवले जाते. मात्र सध्या नवी मुंबई शहरात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. ‘ओ’ पॉझिटिव्ह आणि ‘ओ’ निगेटिव्हसारख्या दुर्मिळ रक्ताचा साठा पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे रक्त जमा करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागत आहे. पूर्वी नवी मुंबई शहरात वर्षभरात रक्ताच्या सहा हजार पिशव्यांचे संकलन होत होते. त्यावेळी पालिकेचा वैद्यकीय विभाग सामाजिक संस्थांना आता रक्तदान शिबिरे घेऊ नका, अशी विनंती करीत होता. मात्र आता हेच संकलन निम्म्याने कमी होऊन थेट साडेतीन हजार पिशव्यांवर आले आहे.
यंदाच्या वर्षात जानेवारीपासून ते आतापर्यंत रक्ताच्या तीन हजार पिशव्यांचे संकलन झाले आहे. याच तुलनेत रक्ताचे संकलन झाले तर पुढील दोन महिन्यांत त्यामध्ये आणखी ६०० पिशव्यांची भर पडणार आहे.
रक्ताची निर्माण झालेली टंचाई कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. वर्दळीच्या भागात रक्तदान शिबिरांचे पालिकाही आयोजन करणार आहे.
सुट्टीच्या कालावधीत कॅम्प कमी
रक्ताचा तुटवडा हा फक्त नवी मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यात आहे. उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत हा तुटवडा निर्माण होतो. सुट्टीच्या कालावधीत रक्तदानाचे कॅम्प कमी होतात. रक्तांची गरज लक्षात घेऊन रक्तदानाचे कॅम्प घेणाऱ्या संस्थांशी संपर्क साधण्यात येत आहे. नागरिकांनाही रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी व्यक्त केली आहे.
            
		





































    
    




















