आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवरील कॅनडाच्या निर्बंधांचा हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना फटका; 74 टक्के अर्ज नाकारले

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवरील कॅनडाच्या निर्बंधांमुळे हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. एकेकाळी परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची कॅनडाला सर्वाधिक पसंती मिळथ होती. मात्र, आता कॅनडाच्या निर्बंधामुळे तिथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. निर्बंधामुळे इमिग्रेशन बंदीच्या काळात कॅनडाने ४ पैकी ३ हिंदुस्थानींचे अर्ज नाकारल्याची माहिती मिळथ आहे. ऑगस्टमध्ये कॅनेडियन पोस्ट-सेकंडरी संस्थांमध्ये शिक्षण घेण्याच्या परवान्यांसाठी सुमारे ७४ टक्के भारतीय अर्ज नाकारण्यात आले आहेत. ऑगस्ट २०२३ मध्ये २०,९०० वरून ऑगस्ट २०२५ मध्ये हिंदुस्थानी अर्जदारांची संख्या ४,५१५ पर्यंत घसरली आहे.

तात्पुरत्या स्थलांतरितांची संख्या कमी करण्यासाठी आणि विद्यार्थी व्हिसाशी संबंधित फसवणूक रोखण्यासाठी कॅनडाने २०२५ च्या सुरुवातीला सलग दुसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परवाने जारी करणाऱ्यांची संख्या कमी केली. रॉयटर्सला दिलेल्या इमिग्रेशन विभागाच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये कॅनेडियन पोस्ट-सेकंडरी संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी परवान्यांसाठी सुमारे ७४ टक्के हिंदुस्थानी अर्ज नाकारण्यात आले. तर ऑगस्ट २०२३ मध्ये हे प्रमाण सुमारे ३२ टक्के होते. आता ते 74 टक्के झाले आहे. प्रत्येक महिन्यात एकूण ४० टक्के अभ्यास परवाने अर्ज नाकारण्यात आले. ऑगस्ट २०२५ मध्ये सुमारे २४ टक्के चिनी अभ्यास परवाने नाकारण्यात आले. हिंदुस्थानी अर्जदारांची संख्या ऑगस्ट २०२३ मध्ये २०,९०० होती. ती आता ऑगस्ट २०२५ मध्ये ४,५१५ वर आली आहे.

परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गेल्या दशकात सर्वाधिक पसंती कॅनडाला होती. मात्र, आता कॅनडाच्या निर्बंधामुळे त्यात घट होत आहे. कॅनडा आणि हिंदुस्थान काही तणावानंतर आता संबंध सुधारण्याचा प्रयत्न आहेत. मात्र, हिंदुस्थानींचे अर्ज नाकारण्यात येत असल्याने याची चर्चा होत आहे. २०२३ मध्ये, कॅनेडियन अधिकाऱ्यांनी बनावट स्वीकृती पत्रांशी संबंधित सुमारे १,५५० अभ्यास परवाना अर्ज उघड केले, त्यापैकी बहुतेक हिंदुस्थानातून आले होते, असे कॅनडाच्या इमिग्रेशन विभागाने रॉयटर्सला ईमेलमध्ये सांगितले. गेल्या वर्षी, त्यांच्या सुधारित पडताळणी प्रणालीने सर्व अर्जदारांकडून १४,००० हून अधिक संभाव्य बनावट स्वीकृती पत्रे आढळून आली, असे त्यात म्हटले आहे. त्यामुळे कॅनडाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी वाढीव पडताळणी लागू केली आहे आणि अर्जदारांसाठी त्यांच्या आर्थिक आवश्यकता वाढवल्या आहेत, असे इमिग्रेशन विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.

कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद यांनी ऑक्टोबरमध्ये हिंदुस्थान दौऱ्यादरम्यान सांगितले की, कॅनडाचे सरकार त्यांच्या इमिग्रेशन प्रणालीच्या वाढत्या प्रक्रियेबद्दल चिंतित आहे परंतु कॅनडामध्ये हिंदुस्थानी विद्यार्थी राहावे अशी त्यांची इच्छा आहे. भविष्यातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसोबत काम करणारे लोक म्हणतात की त्यांना अर्जदारांची उच्च पातळीची छाननी होताना दिसत आहे.