कळंबा कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह, मोक्कातील दोन आरोपींनी आणलेले जिवंत काडतूसे जप्त

कैद्यांकडून कारागृहात लपविलेले मोबाईल सतत सापडत असल्याने नेहमीच चर्चेत असलेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात आता स्वच्छतागृहात जिवंत काडतुसे आढळल्याचा प्रकार समोर आल्याने कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पुण्यातील मोक्कातील बंदी सुरेश बळीराम दयाळू आणि अमीर उर्फ चक्क्या असिम खान (दोघेही रा. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे दोन्ही बंदी पुण्यातील आंदेकर टोळीशी निगडीत असल्याचे समजते.

याप्रकरणी कारागृहातील सुभेदार उमेश शामू चव्हाण (वय 52, रा. तपोवन मैदान शेजारी, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

कळंबा मध्यवर्ती कारागृहात आलेल्या मोक्कातील दोघा आरोपींनी सुरक्षा यंत्रणांना चुकवून चोरटय़ा मार्गाने कारागृहात काडतूस आणल्याची शंका सुरक्षारक्षकांना होती. कारागृह अधीक्षकांच्या परवानगीने सुरक्षारक्षकांनी कारागृहाची झाडाझडती घेतली असता, सोमवारी सकाळी त्यांना सर्कल क्रमांक सातच्या स्वच्छतागृहात प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळलेले 2.5 सेमी लांबी असलेले जिवंत काडतूस सापडले. त्याच्या पाठीमागील बाजूस व्हीएफ 7.65 असे लिहिले आहे. कारागृह सुरक्षारक्षकांनी हे काडतूस जप्त करून ते जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच ज्यांनी हे काडतूस कारागृहात आणले होते. त्या मोक्कातील दोघा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

कारागृहात काडतूस सापडल्याने बंदूकही आणल्याचा संशय बळावला आहे. त्यामुळे जुना राजवाडा पोलिसांसह कारागृहातील सुरक्षारक्षकांकडून बंदुकीचा शोध सुरू केला आहे. कारागृहात जिवंत काडतूस सापडल्याने खळबळ उडाली आहे.

मोबाईल, सिमकार्ड, गांजा अन् जिवंत काडतुसे

n कळंबा कारागृहात मोबाईल, सिमकार्ड, गांजा असे अंमलीपदार्थ सापडण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. कैद्यांच्या वादातून हाणामारीचे प्रकारही घडतात. एका आरोपीने तर बनावट हत्यारे तयार करून त्याचा व्हिडीओ व्हायरल केला हेता. आता तर काडतूस सापडल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.