हिंदुस्थानी वंशाचे जोहरान ममदानी बनले न्यूयॉर्कचे महापौर; ट्रम्प यांच्या विरोधानंतरही मिळवला ऐतिहासिक विजय

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील महापौरपदाच्या निवडणुकीत जोहरान ममदानी विजयी झाले आहेत. डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पक्षाचे आघाडीचे उमेदवार ममदानी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्या आणि टीकेला न जुमानता निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी यांनी अपक्ष उमेदवार आणि माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लिवा यांच्याविरुद्ध न्यूयॉर्क शहरातील महापौरपदाच्या निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

जोहरान ममदानी यांची लढत अपक्ष उमेदवार अँड्र्यू कुओमो यांच्याशी होती. ही निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील पहिली मोठी राजकीय लढत होती. आता अमेरिकेतील सर्वात मोठे शहर असलेल्या न्यू यॉर्कचे नेतृत्व जोहरान ममदानी यांच्याकडे गेले आहे. शहराच्या निवडणूक मंडळाने अहवाल दिला की २० लाखांहून अधिक मतदारांनी मतदान केले, जे १९६९ नंतरच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सर्वाधिक मतदान आहे. शहराची लोकसंख्या अंदाजे ८.५ दशलक्ष आहे. रिपब्लिकन पक्ष आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानींना जोरदार विरोध केला होता. त्यानंतरही ममदानी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

जोहरन ममदानी (34) यांनी आर्थिक असमानता दूर करण्यासाठी आमूलाग्र बदलांना पाठिंबा दिला आहे. ममदानीच्या धाडसी अजेंडाने आणि प्रेरणादायी दृष्टिकोनामुळे न्यू यॉर्कमध्ये हजारो समर्थक मिळाले आहेत. जोहरान ममदानी यांना व्हर्मोंटचे सिनेटर बर्नी सँडर्स आणि न्यू यॉर्कचे प्रतिनिधी अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझ यांनीही प्रचाराला पाठिंबा दिला. अनेक राजकीय घडामोडींमुळे आणि ट्रम्प यांच्या ममदानीच्या विरोधामुळे ही निवडणूक चर्चेत होती. आता या महत्त्वाच्या निवडणुकीत ममदानी यांनी ऐतिहासिक विजय मिळवत न्यूयॉर्कचे महापौरपद मिळवले आहे.