जर एकही वैध मतदार हटवला तर मी मोदी सरकार पाडून टाकीन, ममता बॅनर्जी यांचा इशारा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये SIR प्रक्रियेवरून भाजप आणि निवडणूक आयोगावर तीव्र हल्ला चढवला. त्यांनी राज्यातील लोकांना आश्वासन दिले की एकही वैध मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही. त्यांनी इशारा दिला की जर राज्यातील मतदार यादीतून एकही वैध मतदाराचे नाव काढले गेले, तर नरेंद्र मोदी सरकार पाडून टाकणार

मुख्यमंत्री म्हणाल्या की “जर तुमच्याकडे कागदपत्रे नसतील, तर आमच्या शिबिरांमध्ये या. आम्ही कोणतीही किंमत मोजून तुमची मदत करू. गरज पडली, तर तुमच्या मदतीसाठी आम्ही आमची भांडीसुद्धा विकू.” टीएमसी अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी कोलकात्यात SIR विरोधात मोठ्या पदयात्रेचे नेतृत्व केले. याच दिवशी राज्यात SIR प्रक्रिया सुरू झाली.

मोर्चाच्या समारोपानंतर लोकांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाल्या की SIR म्हणजे एक मूक आणि अदृश्य हेराफेरी आहे. त्यांनी सांगितले, “आपल्याला आपला संघर्ष सुरू ठेवावा लागेल. केंद्रीय यंत्रणांना घाबरू नका. हे सगळं निवडणुकांमुळेच घडत आहे. गरज पडल्यास कायदेशीर मदत घ्या. मी मतुआ समाजाला सांगू इच्छिते घाबरू नका, दीदी इथे आहे. मी जे काही करावे लागेल ते करेन. जर त्यांनी तुम्हाला जबरदस्तीने इथून घालवण्याचा प्रयत्न केला, तर मग इतर अनेकांनाही त्या शक्तीचा सामना करावा लागेल. अल्पसंख्याकांनी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही.”

मतुआ हा अनुसूचित जातीतील समाज असून तो बांगलादेशातून स्थलांतर करून भारतात आला आहे. SIR प्रक्रिया इतक्या घाईने राबवण्यावर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री म्हणाल्या, “शेवटचा SIR 2001 च्या निवडणुकांनंतर झाला होता. 2002-2003 मध्ये बंगालमध्ये कोणतीही निवडणूक झाली नव्हती. SIR झाल्यानंतर 2004 मध्ये निवडणुका झाल्या. ही प्रक्रिया दीड ते दोन वर्षे चालली होती. मग आज एवढी घाई कशासाठी? जर एकही पात्र मतदाराचे नाव यादीतून राहिले, तर मी भाजप सरकार पाडून टाकीन, असा इशारा त्यांनी दिला.