
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हट्टामुळे अमेरिकेत 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या शटडाऊनला आता महिना उलटून गेला आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा शटडाऊन ठरला आहे. या शटडाऊनमुळे अमेरिकेचे तब्बल 1 लाख कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याआधी 2018 मध्ये डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष असताना शटडाऊन सुरू झाला होता, तो 35 दिवसांपर्यंत चालला होता.
अमेरिकेतील आरोग्य सेवा कार्यक्रमासाठी अनुदाने वाढविण्यास ट्रम्प यांच्या अनिच्छेमुळे अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये निधी विधेयक मंजूर होण्यापासून रोखले आहे. या विधेयकावर आतापर्यंत 13 वेळा मतदान झाले आहे, परंतु प्रत्येक वेळी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 60 मतांपेक्षा पाच मते कमी पडले. या शटडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे. काँग्रेसनल बजेट ऑफिस (सीबीओ) नुसार, नुकसान आधीच 11 अब्ज (अंदाजे 1 लाख कोटी) पर्यंत पोहोचले आहे. जर शटडाऊन लवकर संपला नाही, तर चौथ्या तिमाहीत देशाचा जीडीपी 1 टक्के ते 2 टक्के कमी कमी होऊ शकतो. आतापर्यंत 6 लाख 70 हजार सरकारी कर्मचाऱयांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे, तर 7 लाख 30 हजार कर्मचाऱ्यांना पगाराविना काम करावे लागत आहे.
या बंदमुळे 42 दशलक्ष अमेरिकन लोकांना मिळणारी फूड स्टॅम्प मदत थांबली आहे. न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया आणि मॅसॅच्युसेट्ससह 25 राज्यांनी ट्रम्प प्रशासनावर या निर्णयाविरुद्ध खटला दाखल केला.





























































