कामाठीपुराचा पुनर्विकास लवकरच मार्गी लागणार, निविदा प्रक्रियेत एएटीके कन्स्ट्रक्शनची बाजी, म्हाडाने मान्यतेसाठी शासनाकडे पाठवला प्रस्ताव

कामाठीपुराच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. यात एएटीके कन्स्ट्रक्शनने बाजी मारली आहे. आता या कंपनीला पुनर्विकासाचे कंत्राट देण्यासाठीचा प्रस्ताव म्हाडाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला असून या प्रस्तावास मंजुरी मिळताच कामाठीपुराचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लागणार आहे. दक्षिण मुंबईतील 34 एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुरातील 1 ते 15 या गल्ल्यांमध्ये सुमारे 943 उपकरप्राप्त इमारती आहेत. यामध्ये सुमारे 6625 निवासी व 1376 अनिवासी असे एकूण 8001 रहिवासी वास्तव्यास असून 800 जमीन मालक आहेत. पुनर्विकासातून रहिवाशांना प्रत्येकी 500 चौरस फुटांचे हक्काचे घर मिळणार असून म्हाडालादेखील लॉटरीसाठी मोठय़ा प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहेत.