
मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणुकीबाबत जे. जे. रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, पण या तक्रारीबाबत रुग्णालयाने ठराविक मुदतीत अहवाल सादर न केल्याने तसेच सुनावणी दरम्यान आपली भूमिका स्पष्ट न केल्याने आयोगाने रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. महिला डॉक्टरच्या तक्रारीची कोणती दखल घेतली, या तक्रारीबाबत शासनाला अवगत केले का, याची माहिती सात दिवसांत आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत.
परदेशातून आणलेला तीन कोटींचा हुक्का जप्त
परदेशातून आयात केलेला तीन कोटी रुपयांचा हुक्काचा मोठा साठा मुंबई गुन्हे शाखेने जप्त केला. उमरखाडी येथील आनंदराव सुर्वे मार्गावरील एका गोदामात शासनाने बंदी घातलेला निकोटीनयुक्त व वैधानिक इशारा नसलेला विविध फ्लेवर्सचा हुक्काचा साठा करून ठेवण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार युनीट-1 च्या पथकाने त्या ठिकाणी छापा टापून कोटयावधी किंमतीचा हुक्काचा साठा जप्त करण्यात आला. अलबखर पंपनीचा विविध फ्लेवर्सचा हुक्का परदेशातून आयात करण्यात आला होता.
लेफ्टनंटची फसवणूक; दोघांना अटक
शोधनिबंध प्रसिद्धीच्या नावाखाली लेफ्टनंटची फसवणूकप्रकरणी दोघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली. राजू शेट्टी आणि सुरेश म्हादेलकर अशी त्या दोघांची नावे आहेत. तक्रारदार हे अंधेरी येथे राहतात. ते हिंदुस्थानी लष्करात लेफ्टनंट कर्नल पदावर काम करतात. ते आर्टिफिशन इंटेलिजन्स या विषयावर पीएच.डी. करत असून त्यांनी लिहलेले शोधनिबंध आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपरमध्ये त्यांना प्रसिद्ध करण्यासाठी आधी पैसे भरावे लागतील असे सांगत समोरच्या व्यक्तीने 1 लाख 28 हजार रुपये पाठवायला सांगून फसवणूक केली.


























































