
इंडियन प्रीमियर लीग आणि वुमन प्रीमियर लीगमध्ये चषक जिंकणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ विक्रीच्या उंबरठ्यावर उभा आहे. आगामी हंगामापूर्वी आरसीबीची विक्री होणार असून त्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. ब्रिटिश स्पिरिट्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी डियाजिओ पीएलसीने 31 मार्च 2026 पूर्वी नवीन मालक शोधून संघाची विक्री केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात बुधवारी मुंबई स्टॉक एक्सचेंजला पत्रही लिहिण्यात आले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 2024 मध्ये आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले, तत्पूर्वी महिला संघानेही चषक उंचावला होता. मात्र आता मद्य व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आरसीबीची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मुंबई स्टॉक एक्सचेंजलाही सूचित करण्यात आलेले आहे. याबाबत डियोजिओने निवेदनही जारी केले आहे.
युनायटेड स्पिरिट्स लि. त्यांच्या उपकंपनीतील गुंतवणुकीचा आढावा घेत असून यात आयपीएलची मालकी असलेल्या संघाचाही समावेश आहे. हा संघ विकण्याचा निर्णय बोर्डाने घेतलेला आहे, असे डियोजिओने स्पष्ट केले.
आरसीबीचे मालक फरार उद्योजक विजय मल्ल्या होता. मात्र 2016 मध्ये मल्ल्याच्या अडचणी वाढल्या आणि त्याने डियोजिओ कंपनीला मद्य कंपन्यांसोबत आरसीबीचीही विक्री केली. 2008 मध्ये मल्ल्याने 111.6 मिलियन मध्ये हा संघ खरेदी केला होता. त्यावेळी हिंदुस्थानी रुपयात याची किंमत 476 कोटी होती. आयपीएलमधील ही सर्वात महाग टीम होती.
विराटमुळे उंचावली RCB ची ब्रॅण्ड व्हॅल्यू
विराट कोहलीच्या उपस्थितीमुळे आणि आयपीएलमधील पहिल्या विजेतेपदामुळे आरसीबीची ब्रॅण्ड व्हॅल्यू सध्या शिखरावर पोहोचली आहे. अहवालांनुसार, संघाची किंमत जवळपास 269 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2,386 कोटी रुपये) इतकी आहे. या झपाट्याने वाढलेल्या मूल्यमापनामुळे आरसीबीने पाच-पाच वेळा विजेते ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांनाही मागे टाकले आहे.





























































