पार्थ पवारला क्लीन चीट मिळणार, ते जमीन मिळवतील; तुम्ही बसा असेच, उद्धव ठाकरे यांचा टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्यातील कोरेगाव येथील 1800 कोटी रुपयांची जमीन फक्त 300 कोटी रुपयांना विकत घेतल्याचे समोर आले होते. आता पार्थ पवारांनाही क्लीन चीट मिळणार, ते जमीन मिळवतील आणि तुम्ही असेच बसा असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच संपूर्ण देशाच्या माता भगिनींच्या खात्यात दहा हजार टाकणार का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

लातूरमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला कुणाच्याही मुलाबाळांच्या मागे लागायचं नाही, माझी ती नीती, नाही माझी वृत्ती नाही, माझ्यावर ते संस्कार नाही. पण मुख्यमंत्री काय करतायत एक एक प्रकरण ही येतात कशी बाहेर कोण सोडतय बाहेर? आधी मिंधे गटाच्या मंत्र्यांचे प्रकरण बाहेर आलं. आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण आलं. मग सगळे चॅनेलवाले विचारतात तुमची प्रतिक्रिया काय? काही होणार नाही. कारण अमित शहा

यांनी सांगितलं की आता कोणत्याही कुबड्यां शिवाय भाजपा सत्तेत आला पाहिजे. मग आता तर कुबड्या पाहिजेत. मग कुबडी आता फेकण्याची हिम्मत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का? नाही. आता कुबडीला बदनाम करतील आणि फेकून देतील. क्लीन चीट देतील शेतकरी बसेल बोंबलत आणि ते बसतील पैसे कमवून. तुम्ही काय करणार तुमच्याकडे कोणाच लक्ष आहे? निवडणुकीच्या आधी तुम्हाला सगळे कोपऱ्याला गुळ लावून ठेवले. लाडकी बहिण योजना त्यावेळेला दीड हजार रुपये मिळत होते आता सुद्धा मिळतात. पण त्यावेळेला सरसकट मिळत होते. त्यावेळेला सरसकट घरातील सगळ्या महिलांना देत होतात. मग तुम्ही काय म्हणाले की अरे बर आहे रे बाबा आपल्याला काय दीड हजार रुपय सगळ्यांना मिळतात. हे आहे ते सरकार बर आहे. यालाच पुन्हा निवडून देऊ. आता त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार. महिलांच्या नावाने अनेक बापे सुद्धा त्याच्यात घुसवले आणि त्याच्यात सुद्धा पैसे घोटाळा करून ठेवला. आणि आता आणखीन घराघरात भांडण लावतायत.

बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधानांनी कोणाच्या मागणीवरून तिथल्या सर्व महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये टाकले? आमच्या महाराष्ट्र मध्ये निवडणूक असती तर पंतप्रधानांनी पैसे दिले नसते. गुजरातमध्ये असेल बिहार असेल कोणाही बद्दल पोटदुखी नाहीये. पण निवडणुका म्हटल्यानंतर जे पंतप्रधान स्वतःहून कोणी न मागता तिथल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करतात मग पंतप्रधान राज्याचे आहेत कदेशाचे? पंतप्रधान देशाचे आहेत तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत माझ्या प्रत्येक माता भगिनींच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये पंतप्रधानांनी का टाकू नयेत? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.