
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱयाला शेतकऱयांचा तुफान प्रतिसाद लाभत आहे. शेतकरी आणि महिला उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडताना महायुती सरकारवर प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. त्यांना धीर देतानाच उद्धव ठाकरे यांनी, तुमचा संताप निवडणुकीसाठी जपून ठेवा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली होती तशी महायुतीला व्होटबंदी करण्याचा निर्धार करा, असे आवाहन केले.
मुख्यमंत्री म्हणतात, उद्धव ठाकरे टोमणे मारतात. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? हेक्टरी 50 हजार मिळाले पाहिजे हा टोमणा आहे का? हा टोमणा नाही, पण टोला आहे. तो जरूर मारणार.
उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाचा आजचा दुसरा दिवस होता. धाराशीव तालुक्यातील करंजखेडा, लातूरच्या औसा तालुक्यातील भुसणी, अहमदपूर तालुक्यातील थोरलेवाडी, नांदेडच्या लोहा तालुक्यातील पार्डी येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. शेतकऱयांना तातडीने कर्जमुक्ती द्या आणि हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या या मागणीचा पुनरुच्चार करतानाच त्यांनी महायुती सरकारच्या दगाबाजीवर जोरदार प्रहार केला.
मत मागायला नाही, हिंमत द्यायला आलोय
‘मी मत मागायला आलो नाही, तर शेतकऱयांना हिंमत द्यायला आलोय, असे उद्धव ठाकरे सुरुवातीलाच म्हणाले. मराठवाडय़ाचा दौरा पाहून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरीही बोलवताहेत, आमच्याकडे या… आम्हालाही सरकारकडून काही मिळाले नाही असे सांगताहेत. मग पैसा नेमका जातोय कुठे’, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
अदानीच्या सिमेंटला हमीभाव मिळतो, पण शेतकऱयाच्या मालाला नाही
सरकारच्या भ्रष्टाचारावरही उद्धव ठाकरे यांनी आसुड ओढला. ‘महायुती सरकारच्या काळात हजारो कोटींचा भ्रष्टाचार होतोय. मुंबई महापालिका तर महायुतीने लुटून खाल्ली. अदानीच्या सिमेंटच्या पोत्याला कधी हमीभावापेक्षा कमी भाव मिळतो का? आपत्तीग्रस्त शेतकऱयाचे घर वाहून गेले. त्याला घर बांधायचे आहे, मग त्याला घरबांधणीसाठी सिमेंटच्या पोत्याचा भाव कमी होत नाही. सरकारचे सगळे बगलबच्चे मस्त कमावून ऐषोरामात राहत आहेत’, असे उद्धव ठाकरे
म्हणाले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, कैलास पाटील आदी उपस्थित होते.
सातबारा करूया कोरा कोरा… आता कुठे पळालास रे मतचोरा
शेतकऱयांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र सत्तेवर येताच टाळाटाळ सुरू आहे. फडणवीस यांची ती ऑडियो क्लिप उद्धव ठाकरे यांनी सर्वांना ऐकवून दाखवली. ‘आमच्या शेतकऱयांना पूर्ण कर्जमाफी आपण करणार आहोत. शेतकऱयांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा… असे फडणवीस बोलले होते. आता लोक विचारताहेत, आता कुठे पळायलास चोरा…मतचोरा. मतचोरी करून सत्तेवर आलास, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. देवेंद्र फडणवीस जसं बोलले तसं वागले हे दाखवा आणि दोन हजार रुपये मिळवा, अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली. शेतकऱयाचा सातबारा कोरा केला नाही तर पवाराची अवलाद सांगणार नाय, अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवडणुकीपूर्वीची क्लिपही उद्धव ठाकरे यांनी ऐकून दाखवली आणि आता कुणाची अवलाद लावणार, असा सवाल केला. दगडालाही पाझर फुटेल, पण या निर्दयी, निष्ठtर सत्ताधाऱयांना पाझर फुटणार नाही. यांना पाझर आपल्याला मिळून फोडावा लागेल, असे उद्धव ठाकरे शेतकऱयांना म्हणाले.
लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये द्या
महायुती सरकारने लाडक्या बहिणींचीही फसवणूक केली. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ असे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते; पण आता 1500 रुपये मिळण्यातही अडचणी येत आहेत. सरकारने निवडणुकीपूर्वी सांगितल्याप्रमाणे पुढच्या महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावेत, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
शेतकरी मेला तरी चालेल, कंत्राटदार जगला पाहिजे
सरकारने जाहीर केलेल्या 31 हजार 800 कोटींपैकी तुमच्या हातात प्रत्यक्ष किती आले, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी शेतकऱयांना विचारले. त्यावर अनेक शेतकऱयांनी अद्याप काहीच पैसे आलेले नाहीत असे सांगितले. ज्या दिवशी शेतकऱयांच्या खात्यावर पैसे येतील तेव्हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त आनंद मला होईल, असे ते म्हणाले. 20 हजार कोटी तर कंत्राटदारालाच दिले असे एका शेतकऱयाने यावेळी ओरडून सांगितले. त्यावर, शेतकरी मेला तरी चालेल पण कंत्राटदार जगला पाहिजे. याला म्हणतात विकास. कंत्राटदार सुपीक जमिनी वगैरे काहीच बघत नाहीत. शेतकऱयांच्या उरावरून रस्ता नेतात आणि याला मुख्यमंत्री म्हणतात विकास, ‘शेतकऱयांशी संवाद साधण्यासाठी मी घराबाहेर पडल्यानंतर भाजप आणि सगळे मिंधे म्हणजेच अमित शहांनी म्हटल्याप्रमाणे त्या ‘कुबडय़ा’, त्यांनाही आता टरटरीत फोड आलेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
शेतीतले कळते म्हणणाऱयांनो, आता शेतकऱयांमध्ये येऊन दाखवा
उद्धव ठाकरे यांना शेतीतले काय कळते अशी टीका करणाऱया सत्ताधाऱयांवरही उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला. आम्ही शहरीबाबू असूनही शेतकऱयांमध्ये जाऊन उभे राहू शकतो. तुम्हाला शेतीतले कळते तर तुम्ही शेतकऱयांसमोर येऊन उभे राहून दाखवा, असे आव्हान त्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिले. शेतकऱयांना कर्जमाफी दिल्यानंतर मी कधीच विचारायला गेलो नाही, पण ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केल्यानंतर महिलांना पैसे मिळाले की नाही असे विचारायला गेलेले सत्ताधारी आता शेतकऱयांना पॅकेजमधले पैसे मिळाले की नाही विचारायला का येत नाहीत, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
काही होणार नाही, फडणवीस क्लीन चिट देतील – उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन घोटाळा प्रकरणावर टीका केली. ‘आपण मराठी-अमराठी करत भांडत रहायचे आणि सत्ताधारांची मुलंबाळं जमिनी ढापून, जमिनी स्वस्तात लाटून, फुकटात जमिनी घेऊन त्यांचे बंगले शेतकऱयांच्या उरावर बांधताहेत. आधी मिंधेंच्या लोकांची प्रकरणे बाहेर येत होती. आता अजित पवारांच्या मुलाचे प्रकरण बाहेर आले आहे. मला कोणाच्या मुलाबाळाच्या प्रकरणावर बोलायचे नाही, पण मीडिया प्रतिक्रिया विचारतेय म्हणून सांगतो, यात काहीही होणार नाही, चौकशी करतील आणि क्लीन चिट मिळेल. ते जमिनी कमावतील आणि शेतकऱयांनी बसा असेच,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आजचा दौरा
सकाळी 10 वाजता पार्डी, अर्धापूर
सकाळी 11.30 वाजता
डोंगरकडा, कळमनुरी
दुपारी 2 वाजता जवळाबाजार, औंढा नागनाथ
सायंकाळी 4 वाजता पिंगळी स्टेशन, परभणी


























































