
सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर करणाऱया अधिकारी, कर्मचाऱ्यांवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांनी शिस्तभंगाची कारवाई केली. याअंतर्गत बांधकाम विभागातील दोन शाखा अभियंत्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून, नगररचना व बांधकाम विभागातील दोन अधीक्षकांची वेतनवाढ रोखली आहे.
सांगली महापालिकेच्या राजाभाऊ जगदाळे सभागृहात विभागप्रमुख व अधीक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शासकीय पत्रव्यवहार, लोकायुक्त प्रकरणे, मुख्यमंत्री सचिवालयातील संदर्भ, तसेच विधानसभा प्रश्नांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व माहिती घेण्यात आली.
या बैठकीदरम्यान संबंधित अधीक्षकांना त्यांच्या विभागातील या प्रलंबित कामांची माहिती नव्हती. तसेच विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यांना कर्तव्यांची जाणीव नसल्याचे व हलगर्जीपणा केल्याचे आढळले. त्यामुळे आयुक्त सत्यम गांधी यांनी शाखा अभियंता श्रीमती पंकजा अरविंद रुईकर (स्थापत्य) आणि शाखा अभियंता आलम अजीज अत्तार (स्थापत्य) यांना तत्काळ निलंबित केले.
काम न करणे, विनापरवाना गैरहजर राहणे, तसेच वरिष्ठांच्या सूचनेशिवाय कामात ढिलाई केल्याचे उपअभियंत्यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले. शाखा अभियंता पंकजा रुईकर आणि आलम अत्तार यांचे कामकाज असमाधानकारक ठरल्याने त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.






























































